no images were found
सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार मंचची स्थापना करुन अधिकाधिक मतदार नोंदणी करावी – संजय शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात मतदार जागृती मंचाची स्थापना करुन त्यांच्या आस्थापनेत एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. नियुक्त नोडल अधिकाऱ्यांमार्फत महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंच स्थापन करुन त्याव्दारे विद्यार्थ्यांची जास्तीत-जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.
मतदार जागृती मंचच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी व अधिकाधिक मतदार नोंदणी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्याकरीता कोल्हापूर शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची महाराणी ताराराणी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे तसेच अधिकारी व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी बैठकीमध्ये उपस्थित सर्व महाविद्यालयीन अधिकारी व प्रतिनिधींना निवडणूक साक्षरता उपक्रमातील अनुभव विद्यार्थ्यांना येण्यासाठी तसेच विकास प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सामाविष्ट करण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठ परिक्षेत्र येथे निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करावी, असे निर्देश दिले. तसेच महाविद्यालयात, विद्यापीठात नवीन मतदारांकरिता निवडणूक साक्षरता समिती गठीत करा. निवडणूक साक्षरता समितीमध्ये प्रत्येक वर्गातील निर्वाचित केलेले विद्यार्थी असतील, अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्रतिनिधींना दिल्या. महाविद्यालयातील कॅम्पस अँबेसिडर संयोजक असतील व ते नोडल ऑफिसर यांना सहकार्य करतील. महाविद्यालयातील एक किंवा दोन शिक्षकांना (राज्यशास्त्र विभाग) या कार्यक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करा. हे शिक्षक पर्यवेक्षणाचे काम करतील. यासाठी महाविद्यालयातील निवडणूक कामाकाजाचा अनुभव असणा-या शिक्षकांना प्रशिक्षीत करावे व सहभागी करुन घ्यावे. कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यांची जास्तीत-जास्त नोंदणी प्राधान्याने करावी, असेही आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
मतदार नोंदणी व मतदान जनजागृती करणे, मतदारांना मताचे मुल्य विषद करणे हे मतदार जागृती मंचाचे उद्दिष्ट असेल. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पात्र, तथापी अद्यापही मतदार यादीत नाव सामाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव सामाविष्ट करण्यासाठी यामुळे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे खालील अर्ज भरुन द्यावेत.
1) नमुना क्रमांक 6 (मतदार यादीत नाव सामाविष्ट करावयासाठी अर्ज), 2) नमुना क्रमांक 7 (मतदार यादीतील नांवाची वगळणी करावयासाठी अर्ज), 3) नमुना क्रमांक 08 (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज)
मतदारांनी आवश्यकतेप्रमाणे वरील नमुने आयोगाने विकसित केलेल्या https://www.nvsp.in/ या प्रणालीवर ऑनलाईन सादर करावेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना मतदारांनी यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक अचूक नमूद करावा. मतदार यादीत नावाची नोंद असेल तरच निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येतो.
अधिक माहितीसाठी https://eci.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.