
no images were found
जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न आटपाडीत ‘आयसीयू’मध्ये रुग्ण ?
आटपाडी : शहरातील एका हॉस्पिटलमध्ये आयसीयू मधील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्र तंत्र म्हणत अवैधरीत्या जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकाराला विरोध करूनही त्यांच्याशी हुजत घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संपतराव नामदेव धनवडे (वय ४३ रा.आटपाडी) यांनी आटपाडी पोलिसात निवेदन देत तक्रार दिली आहे . या तक्रारीनंतर संबंधित लोकांचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत . आजारी असलेली महिला बरी व्हावी यासाठी त्या महिलेच्या ओळखीमधील काही लोकांनी फक्त प्रार्थना म्हटली असल्याचे पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान, धनवडे यांनी आपल्या तक्रारीत आटपाडी गावात बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम जाणून-बुजून सुरू असल्याचे म्हटले होते. २१ डिसेंबर रोजी वरद हॉस्पिटल आटपाडी येथील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. सदर व्हिडिओत वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील दाखल झालेल्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी तंत्र मंत्राच्या आधारे भोंदूगिरी करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. आदित्य रावण यांनी या कृत्यास विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुजत घालत असल्याचे दिसून येते. सदर व्हिडिओतून हा प्रकार धर्म परिवर्तन व अंधश्रद्धा भोंदूगिरीचा दिसून आला आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकरणे अनेक दिवसांपासून आटपाडी आणि परिसरात होत असल्याची विविध माध्यमाद्वारे समजत आहेत. बेकायदेशीररि अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या गेळे दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संपतराव धनवडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.