no images were found
दूधगंगा पुलावर मुश्रीफांसह इतर नेत्यांकडून लाठीचार्जचा आरोप; कर्नाटक सीमेवर प्रचंड तणाव
कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल आणि निपाणी सीमा हद्दीतील दूधगंगा पुलावर ही घटना घडली. यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर सुमारे दीड तास तणाव होता.
बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी आज महाराष्ट्रातील कागल परिसर दणाणून गेला. बेळगाव येथे मराठी भाषिकांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते कागल येथे एकत्र आले. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कागलच्या मध्यवर्ती बस स्थानकातून ते कर्नाटकच्या दिशेने अर्थात निपाणीकडे चालत जाण्यासाठी निघाले.
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात जोरदार घोषणा बाजी केली. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दूधगंगा पुलावर हा मोर्चा कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून रोखला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी माझ्यावरही लाठीमार केल्याचा आरोप आ. हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
दरम्यान, या गोंधळानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हेही आक्रमक झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला सशर्त दिलेली परवानगी पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने नाकारल्यानंतर त्यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला आहे. कर्नाटक पोलीस आणि आंदोलकांत झालेल्या धक्काबुक्कीनंतर म्हाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे महाराष्ट्र पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले. महाराष्ट्र पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन सोडल्याचे आ. हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.