no images were found
‘प्रिन्स शिवाजी‘ च्या ‘न्यू काॅलेज ऑफ फार्मसी‘ ला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९२० मध्ये स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून गौरविलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेने उचगांव येथील शिक्षण संकुलामध्ये नव्याने उभारलेल्या ‘न्यू काॅलेज ऑफ फार्मसी’ (डी. फार्मसी) या संस्थेच्या दहाव्या विद्याशाखेस ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय), नवी दिल्ली’ या शिखर परिषदेने नुकतीच मान्यता दिली. याचबरोबर संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले आहे.
संस्थेने न्यू काॅलेज ऑफ फार्मसी हे ‘पीसीआय’ च्या निकषांनुसार सर्व शैक्षणिक व अनुषंगिक सुविधांनी परिपूर्ण असे उभे केले आहे. उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा मोड्यूलर प्रयोगशाळा, प्रथितयश लेखकांचे संदर्भ ग्रंथ, संशोधनपर पुस्तके व नियतकालिके यांनी युक्त ग्रंथालय, स्मार्ट क्लासरूम्स, बससेवा इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तापूर्ण डिप्लोमा फार्मसीचे शिक्षण देण्याची ग्वाही संस्थेने दिली आहे.
नोव्हेंबर अखेरीस ‘पीसीआय’ च्या तज्ञ समितीकडून न्यू काॅलेज ऑफ फार्मसीची तपासणी झाली होती. ‘पीसीआय’ कडून प्राप्त झालेले मान्यतेचे पत्र संस्थेचे विकास अधिकारी तथा न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, संचालक सी. आर. गोडसे, प्रा. डाॅ. रविंद्र कुंभार, न्यू पॉलिटेक्निक विभागप्रमुख प्रा. सुभाष यादव, प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. सुहास देशमुख, प्रा. बाजीराव राजिगरे, प्रा. दिपक जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
सद्ध्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी डिप्लोमा फार्मसीसाठीची महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या ऑनलाईन पोर्टलवर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ‘न्यू काॅलेज ऑफ फार्मसी’ मधील प्रवेशाचा पर्याय विद्यार्थ्यांना दि. २१ व २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या फेरीपासून उपलब्ध होईल. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.