no images were found
आयपीएस अधिकारी अमित लोढा निलंबित
आयपीएस अधिकारी अमित लोढा यांचे निलंबन करण्यात आले आहे. बिहारच्या दक्षता विभागाने लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. नेटफ्लिक्सवरील ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ या वेब सीरिजमुळे अमित लोढा चर्चेत आहेत. अमित लोढा यांनी लिहिलेल्या पुस्तकावर ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला मदत केल्याच्या आरोपांखाली विशेष दक्षता विभागाकडून अमित लोढा यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस अमित लोढा हे बिहार पोलीस दलाचे महानिरीक्षक पदरवर असून त्यांनी शासकीय सेवेत असताना नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर या कंपन्यांसोबत व्यावसायिक करार केल्याने लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ही वेबसीरीज 25 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून ही वेबसीरीज अमित लोढा यांनी 2017 मध्ये लिहिलेल्या ‘बिहार डायरीज’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘बिहार डायरीज’ हे पुस्तक बेस्टसेलर ठरले होते. आयपीएस अमित लोढा यांच्यावर लोकसेवा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लोढा यांनी पुस्तक लेखन आणि वेबसीरिज निर्मितीसाठी पोलीस किंवा राज्य सरकारची परवानगी घेतली नव्हती. वेबसीरिजच्या फायनान्स आणि शूटिंगशी संबंधित मुद्द्यामुळे लोढा आता अडचणीत सापडले आहेत. खाकी वेबसीरिजच्या निर्मितीसाठी निधी पुरवण्यामागे लोढा यांचा भूमिका काय याची तपासणी सध्या सुरु आहे.