no images were found
धान विक्रीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2022-23 करीता शासनाने एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 2 हजार 40 व रागी (नाचणी) करीता 3 हजार 578 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबरअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांना धान/नाचणी खरेदी केंद्रावर धान/नाचणी विक्री करायची आहे अशा शेतकऱ्यांनी चालू हंगाम 2022-23 मधील धान (भात) व नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे.
आजपर्यंत काही कारणास्तव जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करु शकले नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा व नोंद करावी, असे आवाहन ही श्री. खाडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहू मार्केट यार्ड येथे संपर्क साधावा.