no images were found
शाश्वत विकास काळाची गरज – प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे
कोल्हापूर : शाश्वत विकास हा सध्याच्या काळाची गरज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाश्वत विकास म्हणजे काय हे त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांनी भरीव संशोधन करावे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थांसाठी शिवाजी विद्यापीठ सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठामध्ये दि. ७ व ८ डिसेंबर रोजी विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभाग्रह येथे करण्यात आले होते. अविष्कार २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागाने केले होते तर संयोजक विद्यार्थी विकास विभाग हे होते. सदर स्पर्धा दोन दिवस पार पडली. यामध्ये संशोधन लेख आणि पोस्टर्स सादर आले होत. यामध्ये पदवी, पदव्युत्तर, एम.फिल./पीएच. डी. साठी प्रवेशित विद्यार्थी आणि एम.फिल./पीएच. डी. साठी प्रवेशित असणारे शिक्षक असे चार स्तर होते.
या स्पर्धेमध्ये १. मानव्यविद्या, भाषा व ललितकला २. वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा ३. मूलभूत विज्ञान ४. कृषी व पशुपालन ५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि ६. वैद्यकीय व औषधनिर्माण या विविध शाखांतर्गत विद्यार्थी/शिक्षक यांनी भाग घेतला होता.
सदर कार्याक्रमाची प्रास्ताविक स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक प्राध्यापक किरणकुमार शर्मा यांनी दिली तर स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी केले. सूत्र संचालन डॉ. किरण डी पवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद जे. पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.