no images were found
एसटी बस दुसऱ्या बसवर धडकून अपघातात मामा भाच्याचा होरपळून मृत्यू
अहमदनगर : पळसेगाव चौफुली येथे एसटी बस दुसऱ्या बसवर मागून धडकली आणि दोन्ही बसच्यामध्ये असलेल्या बाईकवरील दोघांचा होरपळून मृत्त्यू झाला.
या भीषण अपघातात दोघांचा जीव गेला असून सुदैवाने ४३ प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. २७ जण जखमी असून दोघा दुचाकीस्वारांचा या दुर्घटनेत होरपळून दुर्दैवी अंत झाला. मृत दोघे मदन साबळे आण रवींद्र विसे अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी असून त्या दोघातील नाते मामा भाचे असे होते. अपघातात मामा आणि भाच्याचा जीव गेल्यामुळे अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. दोघेही जिवंतपणी होरपळले गेले.
पुणे-राजगुरुनगर डेपोतून नाशिककडे एक एसटी बस चालली होती. नाशिक शहराच्या वेशीवर असताना या एसटी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. एसटी बसचे ब्रेकही निकामी झाले. त्याचवेळी ही एसटी बस थांब्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या बसवर पाठीमागून भरधाव वेगाने जाऊन धडकली.
या धडकेदरम्यान दोन्ही बसच्या मध्ये असलेल्या तीन दुचाकींचा या अपघातात चक्काचूर झाला. यामध्ये दोघांचा जागीच जीव गेला. ही धडक इतकी जबर होती स्पार्किंग होऊन आग भडकली. या आगीमध्ये दुचाकीही जळून खाक झाल्या. मध्ये सापडलेल्या या दुचाकीवर मामा मदन साबळे आणि भाचा रवींद्र विसे हे दोघेही बसच्या चाकाखाली अडकले. बसने तात्काळ पेट घेतल्याने त्यांना जीव वाचवण्यासाठी संधीही मिळाली नाही. त्यांचा होरपळून मृत्यू झाला तसेच एसटी बसही जळून खाक झाली.