no images were found
दर्जेदार अभिव्यक्तीसाठी समाज माध्यमांचा प्लॅटफॉर्म वापरावा- डॉ. आलोक जत्राटकर
कोल्हापूर : दर्जेदार अभिव्यक्तीसाठी समाज माध्यमांचा प्लॅटफॉर्म वापरावा. उच्च प्रतीचे वैचारिक आदान -प्रदान होवून समाजमानस घडविणे अगर मत निर्मिती होणे यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण आणि ऑनलाईन ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने सायबर जागरूकता दिवस कार्यक्रमांतर्गत मराठी विषयाच्या वतीने आयोजित ‘समाज माध्यमे आणि सायबर सुरक्षा’ या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव डॉ. निलेश बनसोडे होते.
डॉ. जत्राटकर म्हणाले की, समाज माध्यम योग्य पद्धतीने हाताळण्याचे भान वापरकर्त्यांना असले पाहिजे. मानवाच्या समाजशिलतेच्या गरजेपोटी समाज माध्यमे निर्माण झाली आहेत. त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. या नवतंत्रज्ञानाचा हात धरून आलेल्या गेमिंग व अतिरेकी वापरामुळे तरुणांमध्ये हिंसेची तीव्रता वाढली आहे. मुलांना गेम खेळू नका, मोबाईल फार वापरू नको, असे सांगितल्यावर आत्महत्या, खून झालेले आहेत. समाज माध्यमे वाईट नाहीत, मात्र त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो, ते कोणाच्या हातात आहे, त्यांचा हेतू काय आहे, यावर त्याचे भलेबुरेपण अवलंबून आहे. स्वच्छ अभिव्यक्तीसाठी हे महत्वाचे आहे.समाजमानस कलुषित करण्यासाठी समाज माध्यमाचा वापर टाळला पाहिजे. तरच सामाजिक स्वास्थ्य व्यवस्थित राहू शकेल. ट्रोलिंगमुळे वापरकर्त्यांचा दृष्टिकोन नकारात्मकतेकडे झुकतो की काय, याची भीती आहे. समोरच्याचे मत विधायक पद्धतीने घेणे व त्याचा विधायक पद्धतीने युक्तीवाद करणे ही भारताची खरी संस्कृती आहे, असे डॉ. जत्राटकर म्हणाले.
डॉ. बनसोडे म्हणाले की आपण सोशल मीडिया वापरताना त्याचा इतरांनी गैर फायदा घेऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. तसेच सोशल मीडियातुन माहितीचा विपर्यास टाळला पाहिजे.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक डॉ. पी एस. लोंढे यांनी केले सूत्रसंचालन एस. डी. भोसले यांनी केलं तर डॉ. सी. ए. बंडगर यांनी आभार मानले.