no images were found
सामाजिक प्रश्नांना भिडण्याचे पोवाड्यात सामर्थ्य- डॉ. आझाद नायकवडी, शाहीर राजू राऊत यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : समाजातील विविध प्रश्नांची भिडण्याची क्षमता पोवाड्यामध्ये असते. एवढेच नाही तर पोवाडा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभा राहून भूमिका घेतो, असे प्रतिपादन शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी आणि शिवशाहीर राजू राऊत यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागाच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘पोवाड्यातून संवाद’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. नायकवडी म्हणाले पोवाड्यामध्ये इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेतला जातो. सूर- तालाशी त्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. शाहिरावर आघात झाल्यानंतर उच्च कोटीचा पोवाडा जन्म घेतो. शाहीर आत्माराम पाटील, अण्णाभाऊ साठे आदींनी शाहिरीच्या माध्यमातून समाज व्यवस्थेवर सडकून टीका केली होती. अलीकडे समाजात मेंदूची गुलामगिरी वाढलेली आहे. अशा गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पोवाडा मदत करू शकतो.
डॉ. राजू राऊत म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून आजपर्यंत पोवाडा आहे जनमत निर्मितीसाठी उपयुक्त माध्यम म्हणून प्रचलित आहे. हा वीरश्रीचा काव्य प्रकार असून ब्रिटिशांच्या विरोधातही जनमत तयार करण्यासाठी पोवाडा उपयोगी ठरला. राजर्षी शाहू महाराजांनी याला बळ दिले. महात्मा फुले यांचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी शाहिरांना बळ दिले. समाजात शाहिराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. शाहिराच्या तालावर समाजाचा तोल अवलंबून असतो.
स्वागत व प्रास्ताविक पत्रकारिता विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी सहा. प्राध्यापक डॉ. सुमेधा साळुंखे, निवृत्त प्राचार्य डॉ. पी.टी सावंत, डॉ. मनीषानायकवडी उपस्थित होते.