Home Uncategorized कोल्हापूर महापालिकेतर्फे १७ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह निमित्ताने भव्य आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर

कोल्हापूर महापालिकेतर्फे १७ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह निमित्ताने भव्य आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर

44 second read
0
0
19

no images were found

कोल्हापूर महापालिकेतर्फे १७ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह निमित्ताने भव्य आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर

शहरातील ११ नागरी आरोग्य केंद्रे, २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे व सर्व रुग्णालयांत आयोजन; नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर,  : भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह २०२६ च्या निमित्ताने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी शहरात भव्य आरोग्य व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व ११ नागरी आरोग्य केंद्रे, २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच महापालिकेच्या अधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत एकाच दिवशी हे शिबिर होणार आहे.

            क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा व शासकीय आरोग्य योजनांची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

            या शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून आवश्यकतेनुसार तपासणी व संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गर्भवती माता, स्तनदा माता व बालकांच्या आरोग्याची तपासणी, लसीकरण आणि पोषणविषयक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

            कुपोषण, रक्तक्षय (ॲनिमिया), संतुलित आहार, पौष्टिक अन्नपदार्थ आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारी पौष्टिक तृणधान्ये, कडधान्ये व स्थानिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्याचे महत्त्वही पटवून दिले जाणार आहे. याशिवाय संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम आणि वेळेत आजारांचे निदान व उपचार याबाबत समुपदेशन करण्यात येईल.

            तपासणीदरम्यान आजाराची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडे किंवा पुढील उपचारांसाठी रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे.

            अनेक आजार सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे न दाखविता वाढत असल्याने नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिला, गर्भवती माता, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच आदिवासी व वंचित घटकांतील नागरिकांसह शहरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. नागरिकांनी आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र अथवा महापालिका रुग्णालयात उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

            हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, प्रशासन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य वर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियोजन आणि समन्वयाने राबविण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दुष्काळाचे सावट असलेल्या सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष मदत पॅकेज द्या, गाळप उसाला प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडं मागणी

दुष्काळाचे सावट असलेल्या सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष …