no images were found
एसटीला सीमा भागात ब्रेक महामंडळाचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे.या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. मात्र आता कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी बसेसना कर्नाटकात न पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बेळगावात महाराष्ट्रातील गाड्यांवर झालेल्या हल्यानंतर परिस्थिती तणावाची बनली आहे. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी बसेसना सीमाभागात आणि कर्नाटकात न पाठवण्याच्या सूचना केल्या आहे. एसटी महामंडळानेही कर्नाटक पोलिसांच्या सुचनेनुसार मोठा निर्णय घेतला आहे. एसटी बसेसचं होणारं नुकसान लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही सीमा भागातील गाड्यांना ब्रेक लावला आहे. पुण्यात शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसना काळे फासले आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरेबागेवाडीजवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.