no images were found
राजाराम महाविद्यालयाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालय हे शहरातील नामांकित महाविद्यालय असून, या महाविद्यालयात कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्हा व सीमा भागातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजाराम महाविद्यालयातील शिक्षण दर्जेदार असून, या महाविद्यालयातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षात महाविद्यालयास भेडसावणारी रिक्त पदे, निधीची कमतरता आदी प्रश्नामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मर्यादा येत आहेत. याचा विपरीत परिणाम शिक्षण पद्धतीवर होत असल्याने, राजाराम महाविद्यालयाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. आज श्री.राजेश क्षीरसागर यांनी राजाराम महाविद्यालयास सदिच्छा भेट देवून महाविद्यालय प्रशासनास भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जास्मिन आत्तार यांनी श्री.राजेश क्षीरसागर यांचे स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाच्या समस्यांबाबत माहिती देताना, विज्ञान शाखेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संशोधनाची संधी देण्यात येते. यातील कला व विज्ञान शाखा अनुदानित आहेत. या महाविद्यालयाचा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास ९५% इतके असून, विविध विषयावरील ८० कार्यशाळा महाविद्यालयाकडून घेण्यात येतात. महाविद्यालयात मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह आहे. महाविद्यालयाचा परिसर मोठा असून दररोज हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग, कर्मचारी आदींची वर्दळ असते. या महाविद्यालयास प्राध्यापक व इतर अधिकारी, कर्मचारी वर्गाची एकूण ६२ पदे मंजूर असून प्रत्यक्षात ३८ पदे भरली गेली आहेत. रिक्त पदामुळे कामाचा अतिरिक्त ताण इतर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांना सहन करावा लागत आहे. या महाविद्यालयाचा परिसर पाहता सुमारे २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ ६ कार्यरत आहेत. यासह सफाई कर्मचाऱ्यांच्या अभावाने निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यासह सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंतीची उंची वाढविणे गरजेचे आहे. महाविद्यालयात पाण्याचा प्रश्न गंभीर प्रमाणात निर्माण झाला असून, अनेकवेळेस विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत प्रयोगासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. यासह शासनाकडून निधी मिळण्यास होणार्या दिरंगाई मुळे कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचारी वेतना अभावी काम सोडून जाण्याची परीस्थिती निर्माण होते. त्यामुळे सद्यस्थिती अत्यंत अल्प मनुष्यबळावर महाविद्यालयाचे काम सुरु आहे. यासह महाविद्यालयातील विना अनुदानित तुकड्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. महाविद्यालयातील सुधारणेकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे रु.५ कोटी आणि कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती कडे रु.४ कोटी निधीची मागणी केली आहे. यातील जिल्हा नियोजन समितीने रु.३ कोटींचा निधी मंजूर केला असून, उर्वरीत निधी प्रलंबित असल्याची माहिती दिली.
याबाबत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दर्जेदार शिक्षणासाठी विद्यार्थी, शिक्षक वर्गास मुलभूत सोयी सुविधा मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयाअंतर्गत रिक्त असलेल्या जागांचे आणि आवश्यक रु.५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार संबधित विभागाकडे रिक्त पदे आणि निधीसाठी तात्काळ पाठपुरावा करू. सरंक्षक भिंतीची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा नियोजन समितीस सादर करावा. जिल्हा नियोजन समितीमधून मागणी केलेला रु.४ कोटींचा पूर्ण मिळण्यासाठी आणि सरंक्षक भिंतीसाठी आवश्यक निधी पालकमंत्री ना.मा.श्री.दीपकजी केसरकर यांच्याशी चर्चा करून हा निधी लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू. यासह विना अनुदानित तुकड्यांच्या संदर्भातही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचेशी चर्चा करून यातून सकारात्मक मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यासह महाविद्यालयास भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे जलअभियंता श्री.हर्षजीत घाटगे यांना दूरध्वनीवरून राजाराम महाविद्यालयास भेट देवून तात्काळ पाणी प्रश्न निकाली लावण्याच्या सूचना दिल्या. यासह महाविद्यालयाच्या विविध विभागाच्या इमारतींची किरकोळ दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्वनिधीतून करण्याच्या सूचनाही सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.एस.आर.पाटील यांना दिल्या.
या बैठकीनंतर श्री.राजेश क्षीरसागर यांनी राजाराम महाविद्यालय परिसरातील इमारत, वर्ग, प्रयोगशाळा, वसतिगृह, ग्रंथालय आदी वास्तूंची पाहणी केली. प्रा.डॉ.आर.एम.कांबळे, डॉ.लता जाधव, प्रा.डी.बी.नाकाडे, प्रा.डॉ.संजय पाठारे, प्रा.डॉ.अंजली पाटील, डॉ.विश्वनाथ बीटे, डॉ.अशोक खोमणे, अधीक्षक श्री.वसंत कांबळे, श्री.शरद गोलाइत, श्री.महेश ओतारी, श्री.राम मोंहडुळे, श्री.अमोल राऊत आदी उपस्थित होते.