no images were found
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसला संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत उत्कृष्ट कामगिरीसाठी SIDM चॅम्पियन पुरस्कार 2026 प्रदान
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसला संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उत्कृष्ट निर्यात कामगिरीसाठी प्रतिष्ठित सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM) चॅम्पियन पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित संस्थेच्या आठव्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण साहित्याच्या निर्यातीत कंपनीने मिळवलेल्या यशाची या पुरस्कारातून दखल घेण्यात आली आहे.
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संरक्षण दल आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांसाठी लहान आकाराच्या कॅलिबरच्या दारूगोळ्याचे उत्पादन करते. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प असून, त्याची वार्षिक उत्पादन क्षमता 30 कोटी राउंड (300 दशलक्ष राउंड) आहे. या प्रकल्पात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या मानकांनुसार दारूगोळा तयार केला जातो. या उपक्रमामुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानालाही बळ मिळत आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि अधिग्रहण महासंचालक ए. अंबरासु उपस्थित होते. या कार्यक्रमात तंत्रज्ञान विकास, उत्पादनातील नावीन्य, डिझाइन, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि निर्यात अशा विविध श्रेणींमध्ये एकूण 15 पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला. तसेच संशोधन आणि विकासासाठी अधिक गुंतवणूक करणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशीष राजवंशी म्हणाले, “भारताची संरक्षण उत्पादन क्षमता मजबूत करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना हा सन्मान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतात उच्च दर्जाची उत्पादने तयार करणे आणि ती जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, यावर आमचा भर आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि स्वदेशी उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक सुरू ठेवू.”
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेससाठी ही आणखी एक महत्त्वाची उपलब्धी आहे. यापूर्वी 2025 मध्ये कंपनीच्या कानपूर येथील दारूगोळा उत्पादन प्रकल्पाला डिझाइन, उत्पादन आणि चाचणी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी SIDM चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कानपूर येथील अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसचा उत्पादन प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रक्रियांनी सुसज्ज आहे. येथे स्वयंचलित उत्पादन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित गुणवत्ता तपासणी, रिअल-टाइम डेटा विश्लेषण आणि डिजिटल देखरेख यांचा वापर केला जातो. या प्रकल्पातील डिजिटल उत्पादन प्रणालीमुळे धोकादायक साहित्य हाताने हाताळण्याची गरज कमी होते. तसेच, डिजिटल सुरक्षा प्रणालीच्या मदतीने उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची 100 टक्के डिजिटल नोंद ठेवली जाते. त्यामुळे उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचा मागोवा घेणे शक्य होते.
या प्रकल्पात बॅलिस्टिक चाचणी केंद्र आहे. येथे इलेक्ट्रॉनिक प्रेशर, व्हेलॉसिटी अँड ॲक्शन टाइम (EPVAT) प्रणालीच्या मदतीने दारूगोळ्याच्या चाचण्या केल्या जातात. या चाचणी केंद्राला नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) यांची मान्यता मिळाली आहे. NABL ही भारतातील चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांना मान्यता देणारी प्रमुख संस्था आहे.
भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात सातत्याने वाढत आहे. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशाची संरक्षण निर्यात 62.66 टक्क्यांनी वाढून विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली. भारत सरकारने 2029 पर्यंत वार्षिक संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशा परिस्थितीत अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसला मिळालेला हा सन्मान भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेचा विस्तार आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय संरक्षण उत्पादनांची वाढती उपस्थिती अधोरेखित करतो.