no images were found
भवानी मंडप परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई; अनधिकृत साहित्य जप्त
कोल्हापूर, : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक २ (छत्रपती शिवाजी मार्केट) आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने भवानी मंडप परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात आज कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान एक हातगाडी, पाच स्टँड बोर्ड, पाच स्टील काऊंटर, एक लोखंडी पार्किंग जाळी, एक लोखंडी टेबल, एक टेंथ, दोन फायबर स्टूल, सात फायबर खुर्ची, ओटीचे २२ नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढील काळातही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यवसाय धारकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, विभागीय कार्यालय क्रमांक २ व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.
अतिक्रमणधारकांना महापालिकेचा इशारा
शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारण्यात आलेले अनधिकृत शेड्स आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.