no images were found
सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
कोल्हापूर, : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’या उपक्रमातून करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी छत्रपती शाहू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे जिल्हा रोजगार समन्वय समितीचे समन्वयक संजय पेंडसे यांनी जिल्ह्यातील उद्योगांमधील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. या सत्रास 67 विद्यार्थी उपस्थित होते.
30 सप्टेंबर रोजी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे आयोजित करिअर मार्गदर्शन सत्रात एनसीएस पोर्टल, मुलाखतीची तयारी, बायोडाटा तयार करणे, सॉफ्ट स्किल्स आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रास सुमारे 139 विद्यार्थी उपस्थित होते. यंग प्रोफेशनल अझरुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख श्री. राजगिरे व जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक पराग जोशी उपस्थित होते.
तसेच, शिवाजी तांत्रिक विद्यालय, कोल्हापूर येथे आयोजित सत्रात ‘महास्वयंम’पोर्टल, एनसीएस पोर्टल, करिअर म्हणजे काय?, दहावी-बारावीनंतरच्या करिअरच्या संधी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रास सुमारे 38 विद्यार्थी उपस्थित होते.
17 ऑक्टोबरपर्यंत करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.