no images were found
रुकडीतील गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने रुकडी येथील साई युवक मंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित युवक युवतींना क्रीडा संचालनाकडून क्रीडापट्टूंसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा योजनांची माहिती क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, युवकांनी व्यायामाची आवड जोपासावी तसेच क्रीडापट्टूंनी डोपिंगपासून दूर रहावे. शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडात कोल्हापूरमध्ये क्रीडा संस्कृती रुजविली. या जिल्ह्याने देशाला अनेक नामवंत क्रीडापट्टू दिले आहेत. राज्य शासनाच्यावतीने खेळांडूसाठी शासकीय नोकरीत 5 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात तसेच ऑलिंपिक विजेत्या खेळाडूला राज्य शासन अनुक्रमे सुवर्ण – 5 कोटी, रौप्य – 3 कोटी तर कांस्य पदकासाठी 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून देते. विद्यार्थी – युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय – जिल्हा प्रशिक्षण, खेलो इंडिया, तसेच मिशन लक्षवेध आदी योजना क्रीडा विभागाकडून राबविल्या जातात. कोणत्याही खेळात निपुण होण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते. खेळाडूंनी हे सातत्य बाळगावे तसेच दैनंदिन सरावाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निरसन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार, मंडळाचे अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष पप्पू जमादार, बापू पवार, दामू दाते, पियुष देसले यांच्यासह इतर क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.