no images were found
२० सप्टेंबरला कोल्हापुरात ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
कोल्हापूर, : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन २० सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ संकल्पनेतून आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी साखर उद्योगातील उपउत्पादनांचा प्रभावी वापर, मूल्यवर्धन आणि परिपत्रक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘सहकारी साखर मूल्यवर्धित उत्पादने आणि जैव-ऊर्जा बहुराज्यीय सहकारी संस्था मर्यादित’ची स्थापना करण्यात आली आहे.
या संस्थेचा पहिला प्रकल्प ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ कोल्हापूर जिल्ह्यात उभारला जात आहे. प्रकल्पामुळे जवाहर, शरद, राजाराम, मंडलिक आणि हालसिद्धनाथ या सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक बळकटीकरणास मदत होणार आहे. साखर उद्योगातून निर्माण होणाऱ्या मळी, प्रेसमड, बगॅस तसेच अन्य जैवइंधन आणि राखेचा वापर करून मूल्यवर्धित व कृषी उपयोगी उत्पादने तयार केली जाणार आहेत.
एकात्मिक प्रकल्पामध्ये दररोज २५० टन क्षमतेचा सिट्रिक ॲसिड प्रकल्प, २० टन क्षमतेचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प आणि २०० टन क्षमतेचा पीडीएम प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासोबत आवश्यक पायाभूत सुविधा व उपयुक्तता सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे सहकारी साखर कारखान्यांवरील आर्थिक दबाव कमी करण्यासोबतच उपउत्पादनांपासून अतिरिक्त मूल्यनिर्मिती आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात देशातील इतर सहकारी साखर क्लस्टरमध्येही हे मॉडेल राबविण्याचा मार्ग या प्रकल्पातून खुला होऊ शकतो.