Home Uncategorized स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

1 min read
0
0
6

no images were found

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

कोल्हापूर  : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती (IEC) या घटकांतर्गत महानगरपालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड साहेब व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, शाळांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या महानगरपालिका हद्दीतील सुमारे 150 शाळांमध्ये हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

            या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना कचरा कसा निर्माण होतो, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील कचऱ्याचे निरीक्षण कसे करावे, कचऱ्यामुळे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे परिणाम कोणते आणि ते कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत प्रात्यक्षिक व खेळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

            तसेच ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी वेस्ट कचरा यांचे वर्गीकरण करणे, कचऱ्यामध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश असतो आणि कोणत्या वस्तू कचऱ्यात जात नाहीत, यामागची कारणे मुलांना समजून सांगितली जात आहेत. पुनर्वापरयोग्य वस्तूंचा वापर आणि योग्य कचरा व्यवस्थापनाच्या सवयी याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या व मनोरंजक पद्धतीने माहिती यावेळी दिली.

            ‘7R’ संकल्पनेतून कचरा कमी करण्याचा संदेश— Refuse, Reduce, Reuse, Repurpose, Rethink, Recycle आणि Repair या संकल्पनांची माहिती देण्यात येत आहे. दैनंदिन जीवनात कचरा कसा कमी करता येईल आणि पर्यावरणपूरक सवयी आपल्या जीवनशैलीचा भाग कशा बनवता येतील याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे.

            याशिवाय स्टीलच्या डब्याचा प्रवास आणि प्लास्टिकच्या डब्याचा प्रवास या माध्यमातून विविध वस्तूंच्या वापरापासून त्यांच्या विल्हेवाटीपर्यंतचा पर्यावरणीय परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येते.

            विद्यार्थ्यांना केवळ माहिती न देता ती प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी विविध खेळ, प्रश्नोत्तरे आणि ‘सापशिडी’ खेळातील विषयाधारित प्रश्नांच्या माध्यमातून चांगल्या सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा कार्यशाळेतील सहभाग वाढत असून, कचरा व्यवस्थापनाबाबत त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे. घनकचरा व्यवस्थापनाची संकल्पना शालेय स्तरावर रुजविण्यासाठी सहभागी शाळांमध्ये ‘रिसायकल कॉर्नर’ उभारण्यात आले आहेत. या कॉर्नरच्या माध्यमातून पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण योग्य वस्तूंबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे.

            तसेच शाळांना वार्षिक कॅलेंडर देण्यात आले असून त्यामध्ये वर्षभर आठवड्यानुसार विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व शाळांनी या उपक्रमांचा नियमितपणे अवलंब करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. कार्यशाळेच्या समारोपावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना साहित्य देण्यात येते. तसेच कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 यांच्या तर्फे शाळेला प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे.

            या जनजागृती कार्यशाळांसाठी संघनंद कांबळे, मानसी बोलुरे, ओंकार शिंगटे आणि रोहित कांबळे हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच शहर समन्वयक मेघराज चडचणकर व आरोगय निरिक्षक भूमी कदम यांची या उपक्रमास उपस्थिती व सहकार्य लाभत आहे.

            शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच कचरा वर्गीकरण, कचरा कमी करणे, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या सवयी रुजवून ‘स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ कोल्हापूर’ घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन अहमदाबा…