no images were found
“जेनझींनी उपजत गुणवत्तेतुन इनोव्हेशन व स्टार्टअप निर्मिती करावी”- कुलगुरू डाॅ. रजनीश कामत
उंचगांव (प्रतिनिधी):-येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंगच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. रजनीश कामत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, जेनझी ही उपजतच बहुगुणी आहे, मल्टीटास्किंग करू शकतात. त्याचा वापर त्यांनी नवनिर्मिती व स्टार्टअपसाठी करावा. टीमवर्कसाठी भावनांक व बुद्ध्यांक वाढवावा. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योजक संजय पेंडसे यांनी ‘विकसित भारत २०४७’ या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या प्रभावशाली क्षेत्रांमधील अद्ययावत तंत्रज्ञान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील एका अग्रगण्य काॅलेजमध्ये प्रवेशित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत ‘नोकरी देणारे बना’ असा कानमंत्र दिला.
आजवर या संस्थेने समाजाला दिशा देणारे विचारवंत, कुशल तंत्रज्ञ, अधिकारी दिले आहेत. ती परंपरा तुम्ही पुढे न्या, असे आवाहन चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. कोल्हापूरचा अभिमानास्पद औद्योगिक वारसा पुढे नेण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी केले.
त्यांनी डाॅ. कामत व श्री. पेंडसे यांचा सत्कार केला.
एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी संस्थेचा इतिहास तसेच एनआयटीमधील इनोव्हेशन, स्टार्टअप व कौशल्य विकास याचे धोरण सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची कटिबद्धता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘आर ॲन्ड डी न्यूजलेटर’ चे प्रकाशन आणि इनोव्हेशन क्लबच्या लोगोचे अनावरण झाले.
पेटंट प्राप्त व शोधनिबंध लेखक प्राध्यापक व विद्यार्थी, गुगल ॲम्बॅसॅडर विद्यार्थी, इनोव्हेशन क्लब लोगो स्पर्धा विजेते, नवीन प्रवेशित गुणवंत विद्यार्थी आणि प्रवेश समिती प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोहन शिंदे, सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील तर आभारप्रदर्शन प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक वाय. एल. खाडे, विनय पाटील, सी. आर. गोडसे, माजी महापौर सई खराडे, स्वाती निगडे, पी. सी. पाटील, फार्मसी प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार, डाॅ. व्ही. एम. पाटील, रजिस्ट्रार, विभागप्रमुख, स्टाफ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.