Home Uncategorized संविधानातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे: भन्ते डॉ. यश काश्यपायन

संविधानातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे: भन्ते डॉ. यश काश्यपायन

1 second read
0
0
14

no images were found

संविधानातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे: भन्ते डॉ. यश काश्यपायन

कोल्हापूर : भारतीय संविधान मानवतावादाची शिकवण देणारे असून, त्यातील बंधुता मूल्य सर्वोच्च महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भन्ते डॉ. यश काश्यपायन यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते काल (दि. २६) बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

केंद्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधान, पाली भाषा आणि संवैधानिक आरक्षण धोरण या विविध पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यास सुमारे दीडशेहून अधिक जणांची उपस्थिती लाभली. त्यांना संबोधित करताना भन्ते डॉ. काश्यपायन म्हणाले, माणसाने दुसऱ्या माणसाचा शत्रू होऊ नये, परस्परांमध्ये ऐक्य आणि मानवतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी संविधानाची गरज आहे. मानवाचे संरक्षण आणि त्याच्या प्रतिष्ठेचे जतन करण्यासाठी भारतीय संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने संविधान आणि बुद्धाच्या धम्मातील मानवतावादी विचारांमध्ये खूप साम्य आहे. बुद्धाची शिकवण माणसाला अहंकार, क्रोध आणि द्वेषापासून दूर नेत असून, मैत्री, करुणा आणि सर्व जीवांप्रती असीम दया बाळगण्याचा मार्ग दाखवते. बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू मानव आणि मानवतेशी संबंधित असून, मनुष्य हा जगाचे रक्षणही करू शकतो आणि विनाशही करू शकतो, त्यामुळे मानवतेचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पाली भाषा संवर्धनाची चळवळ ही केवळ भाषेपुरती मर्यादित न राहता विचारांची चळवळ बनली पाहिजे, अशी अपेक्षा कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे विचार आणि कार्य वेगवेगळे न पाहता त्यातील सकारात्मक विचारांची सांगड घालण्याची गरज आहे. समाजातील विविध घटकांना समान महत्त्व देण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत आणि भारतीय संविधानातही दिसून येते. भारतीयत्व हा आपला धर्म आणि संविधान हा आपला धर्मग्रंथ बनला, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकार होईल, असे प्रतिपादन केले.

धम्माचे गाढे अभ्यासक अमित मेधावी यांनी पाली भाषा ही केवळ एक प्राचीन भाषा नसून भारतीय मानवतावादी परंपरेचे मूळ तत्त्वज्ञान समजून घेण्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पाली, मागधी आणि संस्कृतसारख्या प्राचीन भाषांचा अभ्यास केल्याशिवाय प्राचीन भारताचे ज्ञान आणि धम्मातील मूळ अर्थ समजणे अशक्य आहे. धम्मपदातील शिकवण पाहता मैत्री आणि करुणा हाच खरा सनातन धर्म आहे, असे स्पष्ट केले. अधिकाधिक युवकांनी या अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होऊन धम्माचा चिकित्सक अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत कांबळे, सुरेखा नरदे, विजय कुशाण, नेहा विटेकरी, सुप्रभा चोपडे, सिद्धार्थ दीक्षित, समर्थ भारतीय, डॉ. बालाजी लातुरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुलवीर कांबळे, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. अमोल मिणचेकर उपस्थित होते. तसेच, डॉ. कपिल राजहंस, अॅड. करूणा मिणचेकर, अनिल वेटम, डॉ. चंद्रकांत कुरणे, डॉ. तेजपाल मोहरेकर उपस्थित होते. केंद्राचे संचालक डॉ. पवन गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सागर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन

चंद्रपूरच्या जंगलात’ चे आज शिवाजी विद्यापीठात अभिवाचन कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी …