no images were found
पूनमताई तोडकर यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड
कोल्हापूर(प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार पूनमताई तोडकर यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी विचार मंचच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यात येणार असून, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या विचारांशी जोडलेले नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून, महिलांना सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेण्यात येईल. तसेच युवकांना संघटनेशी जोडून त्यांच्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांच्या स्थानिक समस्या आणि जनहिताचे प्रश्न संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यावरही भर दिला जाणार आहे.
याशिवाय रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, महिला व युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संघटनेचे कार्य केवळ राजकीय चौकटीपुरते मर्यादित न ठेवता समाजसेवा आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा मानस पूनमताई तोडकर यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार असून, संघटनेची आगामी दिशा आणि कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे. संघटन विस्तारासोबतच जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विचार मंचाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहणे, महिला आणि युवकांना नेतृत्वाची संधी देणे आणि जनसेवेला प्राधान्य देणे, हा आमचा प्रमुख संकल्प आहे,” असे पूनमताई तोडकर यांनी सांगितले.या निवडीबद्दल मंचाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूनमताई तोडकर यांचे अभिनंदन करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.