no images were found
लोकनृत्य महोत्सवातून राज्याच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपूर येथे लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन
कोल्हापूर, : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृतीचा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोकनृत्य महोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिर, जयसिंगपूर, कोल्हापूर येथे दररोज सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये प्रचलित असलेल्या लोकनृत्य परंपरांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण लोकजीवनाचे दर्शन घडविणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. लोकनृत्य हे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक जीवनाशी जोडलेले असून, त्यातून विविध प्रदेशांच्या परंपरा, श्रद्धा, रूढी आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब पाहायला मिळते.
या तीन दिवसांत तारपा, बोहाडा, सोंगी मुखवटे, मोरघा, लावणी, पालखी, बाल्या, दिवली, दिंडी, कोळी, शेतकरी, वाघ्या-मुरली, जागरण-गोंधळ, जोगवा, लेझीम, धनगरी (कैपत), पोतराज, मंगळागौर, बंजारा, गौर नाच, गज धनगरी आणि भिल्ल आदिवासी या विविध लोककला व लोकनृत्य प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य आणि लोकजीवनाचे मनोहारी दर्शन रसिकांना घडणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकनृत्य प्रकार, पारंपरिक कला आणि लोककलावंतांच्या सादरीकरणातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. लोककलेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरांचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत हस्तांतरण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील लोककला व लोकपरंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
‘लोकनृत्य महोत्सवा’चा प्रवेश विनामूल्य असून, जयसिंगपूर, कोल्हापूर तसेच परिसरातील रसिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा अनुभवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत संगीता कैलास खेडेकर यांनी केले आहे.