no images were found
जिल्हा नियोजन मधून ‘सीपीआर’ ला तातडीचा १ कोटींचा विशेष निधी
पाच जिल्ह्यातील ‘ हिमोफिलिया’ रूग्णांना मोठा दिलासा!
कोल्हापूर( प्रतिनिधी) : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील गंभीर बिघाडामुळे आयुष्यभर रक्तस्रावाच्या धोक्याशी सामना करणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. हिमोफिलिया ‘ए’ रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘हेमलिब्रा’ इंजेक्शनच्या खरेदीसाठी सीपीआरला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा तातडीचा विशेष निधी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील सुमारे ५५० हिमोफिलिया रुग्णांच्या उपचारांना मोठा आधार मिळणार असून, औषधांच्या उपलब्धतेअभावी उपचारात खंड पडण्याची चिंता दूर झाली आहे.
हिमोफिलिया रुग्णांसाठी प्रत्येक दिवस हा अनिश्चिततेचा असतो. शरीरात रक्त गोठविणारे आवश्यक घटक कमी असल्याने किरकोळ दुखापतीपासून अचानक होणाऱ्या अंतर्गत रक्तस्रावापर्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषत: बालरुग्णांमध्ये वारंवार होणाऱ्या रक्तस्रावामुळे सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तस्राव झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपचार सातत्याने उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याच पार्श्वभूमीवर ‘हेमलिब्रा’ हे अनेक हिमोफिलिया ‘ए’ रुग्णांसाठी आशेचे महत्त्वाचे साधन ठरले आहे. नियमित प्रतिबंधात्मक उपचारामुळे रक्तस्रावाच्या घटना कमी होण्यास मदत होते.
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला जिल्हानियोजनमधून यापूर्वी औषध खरेदी, यंत्रसामुग्री तसेच बांधकामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी खर्च झाल्याने नव्याने हा तातडीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील रुग्णांना सप्टेंबर २०२५ पासून या उपचाराचा लाभ मिळत आहे. सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या सुमारे ५५० हिमोफिलिया रुग्णांसाठी ‘हिमलिब्रा’ औषधांचा नियमित पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत विविध वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. औषधांचा साठा संपल्यास रक्तस्रावाच्या घटनांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उपचारात सातत्य राखण्यासाठी आवश्यक औषधसाठा वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे.
या उपचारासाठी दरवर्षी साधारण अडीच ते तीन कोटी रुपयांच्या औषधांची आवश्यकता भासते. त्यामुळे केवळ एकदाच निधी उपलब्ध करून देण्यापेक्षा भविष्यातही औषधांचा नियमित पुरवठा सुरू राहील, यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन निधीची आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी भूमिका पालकमंत्री आबिटकर यांनी घेतली आहे. हिमोफिलिया रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी ‘हिमलिब्रा’चा नियमित पुरवठा हा केवळ औषधांचा प्रश्न नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवनाशी जोडलेला विषय आहे.
आर्थिक अडचणीमुळे एकाही रुग्णाचा प्रतिबंधात्मक उपचार बंद पडू नये, यासाठी सातत्यपूर्ण निधी आणि औषधसाठा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीमुळे सध्या सीपीआरमधील औषध उपलब्धतेचा प्रश्न सोडविण्यास महत्त्वाची मदत होणार आहे. मात्र पुढील काळात रुग्णसंख्या, औषधांचा वापर आणि वार्षिक गरज लक्षात घेऊन निधीचे सातत्यपूर्ण नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.