no images were found
एक लाख घरांवर 2 ऑक्टोबर पर्यंत सौर प्रकल्प बसविण्यासाठी योजना गतिमान करा:जिल्हाधिकारी
कोल्हापूर : छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना व स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) सोलर योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात दोन ऑक्टोबर पर्यंत एक लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना गतिमान करून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
रूफ टॉप सोलर प्रकल्प समन्वय व अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस, एम.एस. मिसाळ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री सूर्य घर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण 50 हजार 811 अर्ज प्राप्त झाले होते, त्यामधील 31 हजार 394 कामे पूर्ण झाली आहेत. तर स्मार्ट सोलर योजनेअंतर्गत 23,177 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 197 कामे पूर्ण झाली आहेत. असे एकूण एक लाख उद्दिष्टाच्या तुलनेत 73 हजार 988 अर्ज प्राप्त असून 31591 कामे पूर्ण झाली. आहेत उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
2 ऑक्टोबर पर्यंत एक लाख उद्दिष्टाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरीय व गाव स्तरीय समित्यांची कार्यशाळा घेण्यात यावी, योजना लाभार्थी निवड व अर्ज नोंदणी बाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, सौर प्रकल्प स्थापना व अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन करण्यात यावे, तसेच अनुदान व कर्ज प्रक्रियेची माहिती देण्यात यावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना ही घरगुती वीज ग्राहकांसाठी लागू असून विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये एक किलो क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये अनुदान, दोन किलो वॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 60 हजार रुपये अनुदान तर तीन किलो वॅट व त्याहून अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी 78 हजार रुपये कमाल अनुदान देण्यात येते. यामध्ये पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीची हमी असून या प्रकल्पाचे आयुष्यमान 25 वर्षापर्यंत आहे. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिय रूफ टॉप (स्मार्ट) सोलर योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील एक लाख 54 हजार 622 घरगुती वीज ग्राहक व आर्थिक दृष्ट्यादुर्बल तीन लाख 45 हजार 375 घरगुती वीज ग्राहकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. 100 युनिट पेक्षा कमी वापर असणारे दारिद्र्यरेषेखालील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल पाच लाख कुटुंबियांसाठी सुमारे 25 वर्ष मोफत वीज याद्वारे देण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांचे उद्दिष्ट छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे हे आहे. रूफ टॉप स्मार्ट सोलार योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना 47 हजार पाचशे रुपये अनुदान असून 100 युनिट पेक्षा कमी वापर असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकां मधील सर्वसाधारण गटासाठी 40 हजार , अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती मधील ग्राहकांसाठी 45 हजार अनुदान आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना लाभ देण्यासाठी विविध स्तरावर अंमलबजावणी समित्या कार्यरत असून त्यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.