no images were found
गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर)
कोल्हापूर(प्रतिनिधी):- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आवश्यक कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी पदवीधर मित्रचे संस्थापक व अध्यक्ष तथा श्रीराम दूधसंस्थेचे संचालक माणिक पाटील (चुयेकर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सहकार कायद्यातील निवडणूक विषयक नियमांनुसार कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या ९० दिवसांच्या कालावधीत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे विभागीय सहकार उपनिबंधकांना आवश्यक तो कालावधी वाढवून देण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, फडणवीस सरकार स्वतःच्या सोयीच्या व्यक्तींना प्रशासक मंडळावर नेमण्याच्या भीतीने मागील संचालक मंडळाने मुदत संपल्यानंतर तातडीने निवडणूक घेण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने ९० दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले.
मात्र, सहकार कायद्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला कालावधी उपलब्ध न झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यामुळे अंतिम निकालाला न्यायालयीन आव्हान दिले जाऊ शकते आणि नवीन संचालक मंडळ स्थापन होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक कायदेशीर आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाने आवश्यक त्या कालावधीची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माणिक पाटील (चुयेकर) यांनी केली आहे.