no images were found
महानगरपालिका निवडणूक एप्रिल-मे दरम्यान
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक राज्य शासनाच्या आदेशानुसार एप्रिल किंवा मे दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेची यंत्रणा सध्या नव्याने प्रभाग रचना करण्यात व्यस्त आहे. निवडणुकीसाठी कर्मचारी नेमणूकीचे कामासही वेग आल्याचे दिसतेय. त्यामुळे नगरपालिकेत निवडणुकीची धामधूम दिसून येत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ८१ सदस्य निश्चित आहेत. मात्र, प्रभागांबाबत संभ्रम आहे. निवडणूक बहुसदस्यीय होणार असली, तरी त्रिसदस्यीय की चार सदस्यीय, या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
महापालिका सभागृहाची मुदत संपून २ वर्षे झाली. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे ही निवडणूक होऊ शकली नव्हती. त्या कालावधीपासून डॉ. कादंबरी बलकवडे या प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिका प्रशासनाने एक सदस्यीय ८१ प्रभाग रचना करून आरक्षण निश्चित केले. पुढे अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणेपर्यंत शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रक्रिया असताना पुन्हा कोरोनाच्या प्रकोपात वाढ झाल्यामुळे ही प्रक्रिया स्थगित झाली होती.
सध्या राज्य सरकारच्या आदेशानंतर महापालिका निवडणूक कामकाज सुरू केले आहे. निवडणूक कार्यालयात आता पहिल्या टप्प्यात ३० कर्मचारी कामकाज पाहतील. निवडणूक कक्षेत पूर्णवेळ अधीक्षकही असणार आहेत. सुमारे ३ ते साडेतीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून त्यानंतर मुख्य निवडणूक कार्यक्रम हा ४५ दिवसांचा असेल. ही निवडणूक मार्च- एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे असली तरी त्याकाळात दहावी, बारावी तसेच इतर शाळात परीक्षा असल्याने मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या अखेरीस होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.