Oplus_131072
no images were found
मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध ‘सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस’चा देशभरात ५०० शाखा विस्ताराचा संकल्प
गोवा : मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध एनबीएफसी कंपनी सुप्रा पॅसिफिक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने पुढील तीन वर्षांत देशातील १५ राज्यांमध्ये ५०० शाखा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. कंपनीने या विस्तारातून २,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचवेळी मुंबईतील अंधेरी येथे कंपनीच्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
विस्तार योजनेअंतर्गत कंपनी गुजरात, दिल्ली, राजस्थान, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये नवीन प्रवेश करणार असून, महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील विद्यमान नेटवर्क अधिक मजबूत करणार आहे. पहिल्या टप्प्यात गोव्यात पाच नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीच्या मालमत्तेत ६४.३९ टक्क्यांची वाढ होत ती २९० कोटी रुपयांवरून ४९९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात ७५० कोटी रुपयांची मालमत्ता गाठण्याचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे.
कंपनी गोल्ड लोन, मायक्रोफायनान्स, वाहन कर्ज आणि व्यावसायिक कर्जांसह व्यापारी व एमएसएमईंसाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच ग्राहकांना जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी नवीन मोबाइल ॲपही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रवी यांनी सांगितले की, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरे तसेच ग्रामीण भागात औपचारिक कर्जसेवा पोहोचवून आर्थिक समावेशकतेला चालना देणे आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला हातभार लावणे हे कंपनीचे प्रमुख ध्येय आहे.
दीर्घकालीन विकास आराखड्याचा भाग म्हणून कंपनी पुढील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या ७०० वरून २,००० पेक्षा अधिक करण्याची योजना आखत असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) सार्वजनिकरित्या जारी करण्याचाही कंपनीचा मानस आहे.