no images were found
सावित्रीबाई करणार भिडे वाड्याला शिक्षणाचं तोरण बांधण्याचा निर्धार…
स्त्री शिक्षणाचा विचारही पाप मानलं जात असताना सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवण्यासाठी समाजाच्या विरोधात उभं रहात इतिहास घडवला. घरातून विरोध, समाजाकडून अपमान, रस्त्यावर चालताना अंगावर फेकले जाणारे शेणगोळे… पण या सगळ्यापुढे सावित्रीबाईंचा निर्धार कधीच डगमगला नाही. डोळ्यात अश्रू असले तरी मनात शिक्षणाचं स्वप्न आणि प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे ही जिद्द त्यांना पुढे चालत राहण्याची ताकद देत राहिली. “हे शेणगोळे नाहीत… आपल्या कार्याचं महत्व कळल्यावर उधळली जाणारी फुलं आहेत असंच मानते मी.” सावित्रीबाईंचे हे शब्द केवळ संवाद नाहीत, तर एका स्त्रीच्या आत्मविश्वासाचा आणि समाज बदलण्याच्या शक्तीचा आवाज आहेत. शिक्षणासाठी स्वतःचं सुख आणि आयुष्य पणाला लावणाऱ्या सावित्रीबाईंचा हा संघर्ष मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतून पुन्हा जिवंत होणार आहे.
सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले-प्रभुलकर म्हणाल्या, ‘भारताच्या इतिहासातील स्त्रियांसाठी मोठं वळण असणारा क्षण म्हणजे क्रांतिज्योती सावित्री आणि ज्योतिबा फुले ह्यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा. हे जर घडलं नसतं तर आज आपण सर्व स्त्रिया दुय्यम दर्जाचं आणि अंधकारातच राहिलो असतो. हा निर्णय काळाच्या पुढचा तर होताच पण त्या काळच्या परिस्थिती मध्ये अत्यंत धाडसी होता. समाजाचा, घरातल्यांचा विरोध पचवून हे कार्य हे दोघे धडाडीने करत राहिले म्हणून आज स्त्री स्वाभिमानाने जगू शकत आहे. त्यांच्या संघर्षाचा प्रत्येक प्रसंग साकारताना अंगावर काटा येतो. त्यांनी सहन केलेल्या वेदना शब्दांत मांडणं कठीण आहे.’
इतिहासातील या प्रेरणादायी आणि भावनिक पर्वाचे साक्षीदार व्हायला विसरू नका. नक्की पहा ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.