Home सामाजिक मानवी आरोग्यावर ई-कचऱ्याचे घातक परिणाम: डॉ. रानिया लम्पाऊ

मानवी आरोग्यावर ई-कचऱ्याचे घातक परिणाम: डॉ. रानिया लम्पाऊ

14 second read
0
0
8

no images were found

मानवी आरोग्यावर ई-कचऱ्याचे घातक परिणाम: डॉ. रानिया लम्पाऊ

कोल्हापूर,: इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे (ई-कचरा) अयोग्य व्यवस्थापन हे आज जागतिक स्तरावर मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याची चिंता ग्रीसच्या शैक्षणिक सल्लागार आणि विचारवंत डॉ. रानिया लम्पाऊ यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मिशन लाईफ अभियाना’अंतर्गत डॉ. लम्पाऊ यांचे ‘ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थिती होती.

ई-कचऱ्याच्या अनिर्बंध वाढीमुळे समाजात आरोग्याची मोठी समस्या निर्माण होत असल्याचे सांगताना डॉ. लम्पाऊ म्हणाल्या, असंघटित क्षेत्रात कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कामगारांचे आरोग्य गंभीर धोक्यात आहे. हा कचरा उघड्यावर जाळल्याने यामधील पारा, कॅडमियम इत्यादी विषारी मूलद्रव्यांच्या विषारी धुरामुळे कामगारांना फुफ्फुसाचे गंभीर आजार होत असून, यकृताचे, मूत्राशयाचे नुकसान आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुरेशा सुरक्षेच्या अभावामुळे या कामगारांना आयुष्यभर अपंगत्व आणि इतर शारीरिक दुखापतींना सामोरे जावे लागत आहे.

ई-कचऱ्याच्या समस्येचा सर्वात क्रूर आणि घातक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याबद्दल डॉ. लम्पाऊ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, लहान मुलांची शरीरे प्रौढांच्या तुलनेत विषारी रसायनांना खूप लवकर बळी पडतात, कारण त्यांची जैविक संवेदनशीलता उच्च दर्जाची असते. त्यातच त्यांच्या शरीरात पर्यावरणातील विषारी घटकांचे शोषण त्यांच्या शरीरात वेगाने होते, तर दुसरीकडे मुलांमधील नैसर्गिक उत्सर्जन व विषमुक्ती यंत्रणा पूर्णपणे विकसित झालेली नसते. ई-कचऱ्याने प्रदूषित असलेल्या भागात राहणाऱ्या गरोदर मातांमुळे होणाऱ्या बाळाच्या आरोग्याला जन्माआधीच मोठा धोका निर्माण होतो. या समस्येची दुसरी गडद बाजू म्हणजे, अनेक अनधिकृत रिसायकलिंग केंद्रांमध्ये होणारे बालमजुरीचे शोषण लहान मुलांचे संपूर्ण भविष्य अंधारात ढकलत आहे.

त्या म्हणाल्या, पर्यावरणाचा विचार करता, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे आणि त्यांच्या उत्पादनापासून ते विल्हेवाटीपर्यंत मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत असल्याने हवामान बदलाचे संकट गडद होत आहे. हा कचरा उघड्यावर टाकल्याने किंवा जाळल्याने हवा, माती आणि जमिनीखालील पाण्याचे तीव्र प्रदूषण होत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

या जागतिक संकटावर मात करण्यासाठी डॉ. लम्पाऊ यांनी, ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ आणि ‘5R’ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करणे (Reduce), पुनर्वापर करणे (Reuse), दुरुस्ती करणे (Repair), नूतनीकरण (Refurbish) आणि शास्त्रीय पद्धतीने पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे आयुष्य वाढवणे आणि केवळ निरुपयोगी साधनांवरच प्रक्रिया करणे ही काळाची गरज बनली असल्याचे सांगितले.

या संदर्भातील जनजागृतीमध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांची भूमिका महत्त्वाचे असल्याचे सांगून डॉ. लम्पाऊ म्हणाल्या, सध्याच्या तरुण पिढीमध्ये गॅजेट्स आणि नवनवीन उपकरणे बदलण्याचा वेग प्रचंड असल्याने कॅम्पस स्तरावर ई-कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो, यासाठी विद्यापीठांनी कडक ई-कचरा व्यवस्थापन धोरण आखणे आवश्यक आहे. विद्यार्थी या चळवळीत ‘बदलाचे दूत’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. योग्य ई-कचरा व्यवस्थापनामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासोबतच नैसर्गिक संसाधनांचे जतन होईल आणि हे पाऊल संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांची (SDGs) पूर्तता करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, डॉ. लम्पाऊ यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असून ई-कचऱ्याच्या समस्येला असणारे विविध आयाम आणि त्याच्या व्यवस्थापनाचे महत्त्व अतिशय नेमकेपणाने प्रभावी पद्धतीने सांगितले आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचे ई-कचरा व्यवस्थापन केंद्र आणि सामाजिक समावेशन केंद्र या माध्यमातून प्रयत्न केले जातील. तसेच ई-कचरा संकलन ही शिवाजी विद्यापीठातील नियमित प्रक्रियेचा भाग असेल आणि या संदर्भात काही लघु अभ्यासक्रमही सुरू करण्यात येतील, असे सांगितले.

सुरवातीला इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉ. पवन गायकवाड यांनी स्वागत केले. सामाजिक समावेश अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम कोल…