Home कृषि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार-पणन मंत्री जयकुमार रावल

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार-पणन मंत्री जयकुमार रावल

1 second read
0
0
11

no images were found

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार-पणन मंत्री जयकुमार रावल
· फळे, भाजीपाला व इतर शेतमाल भेसळखोर ‘पणन’ च्या रडारवर

मुंबई, : राज्यातील शेतकरी दर्जेदार फळे, भाजीपाला तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्र, काही ठिकाणी फळांची गोडी वाढविण्यासाठी, कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी किंवा अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
यासंदर्भात कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या तसेच थेट पणन व्यवस्थेद्वारे होणाऱ्या शेतमाल खरेदी-विक्रीमध्ये भेसळ आणि घातक रासायनिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार पणन संचालनालयाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या आणि थेट पणन परवाना धारकांना महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला दर्जेदार शेतमाल ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण स्वरूपात पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. काही ठिकाणी फळे कृत्रिमरित्या पिकविणे, त्यांची गोडी वाढविण्यासाठी रसायनांचा वापर करणे, फळे व भाजीपाल्यांना कृत्रिम रंग देणे तसेच अन्नधान्य अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी बाजार समित्यांनी नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच भाजीपाला, फळे आणि अन्नधान्याच्या साठवणूक व वाहतुकीमध्ये कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरास प्रतिबंध करून पर्यावरणपूरक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अन्नधान्य, फळे किंवा भाजीपाल्यामध्ये भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळ करणाऱ्या परवाना धारकांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाहीही करण्यात येईल, असे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या व थेट पणन परवाना धारकांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पणन मंत्री रावल यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In कृषि
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये करुणा पांडे यांच्यासोबत काम करताना रसिका धोपाळे

पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये करुणा पांडे यांच्यासोबत काम करताना रसिका धोपाळे सोनी सबची पुष्पा इम…