no images were found
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेवाभाव बाळगावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएस या पदवीवर न थांबता भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे .त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी आणि गरीब रुग्णांच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले . महासैनिक दरबार हॉल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय पदवीदान समारंभात ते बोलत होते.व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड ,वैद्यकीय अधिष्ठाता डॉ .सदानंद भिसे ,वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण मिरजे व आरोग्य विज्ञान विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ .बाबासाहेब माने उपस्थित होते .
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले ,सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च करून सीपीआर रुग्णालयाचे नूतनीकरण केले आहे या ठिकाणी रुग्णांना सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी वैद्यकीय मंत्री म्हणून आपण प्रयत्नशील असून साधारणता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्याला आपले प्राधान्य असेल.आगामी दोन वर्षात जिल्ह्यातील कोणताही पेशंट उपचारासाठी पुण्या – मुंबईला जाणार नाही . त्याला सर्व सुविधा सीपीआरच्या प्रांगणात मिळतील यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
मनपा आयुक्त श्री भारूड म्हणाले,पदव्युत्तर शिक्षणाला विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे कारण भविष्यात सुपर स्पेशालिटीला अधिक महत्त्व असेल.जबाबदारी,मूल्य,कष्ट आणि प्रामाणिकता याची कास उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी धरावी.यावेळी डॉ भिसे,डॉ.माने यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले .
सन 2020 च्या बॅचचे व सन 2025-26 या वर्षात MBBS ची पदवी उत्तीर्ण झालेल्या 150 विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.आभाली मेहरुणकर,डॉ अक्षरा रवीशंकर,डॉ अमिषा झा या विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अतिशय नेटक्या स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख ,संबंधित शाखांचे सर्व प्राध्यापक , विद्यार्थी त्यांचे पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालयात अत्याधुनिक व्हेरीकोज व्हेन्स लेझर ॲबलेशन यंत्र आणि डिजिटल मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. सीएसआर फंडाच्या माध्यमातून झरीवाला चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक गझाफर झरिवाला रिजवी यांच्या लेझर मशिन देणगी स्वरूपात देण्यामुळे कोल्हापुरातील रुग्णांची सोय झाली आहे.व्हेरिकोज व्हेन्स (पायावरील सर्पाकृती वाढलेल्या रक्तवाहिन्या)या व्हेन्समुळे पायाचे दुखणे ,सूज आणि जखमा या आजारांची शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो मात्र सीपीआर मधील या मशिन्समुळे रुग्णांना मोफत उपचार मिळण्यास मदत होईल.याप्रसंगी डॉ.गिरीश कांबळे,डॉ.संजय देसाई डॉ.तुकाराम माने,डॉ. स्वेनिल शहा,डॉ शुभम हिरेमठ आदी उपस्थित होते .