no images were found
विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका- केसरकर
औंध : ‘अनेक पालकांना कोरोनामुळे पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरणे शक्य झाले नाही. कोरोनामुळे बऱ्याच पालकांना हलाखीच्या परिस्थितीशी सामोरे जावे लागले. तेव्हा पालक शैक्षणिक शुल्क भरू शकले नाहीत यामागे शुल्क बुडवण्याचा त्यांचा उद्देश नाही, तेव्हा शिक्षणसंस्थांनी दाखले व निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये,’ असा इशारा शैक्षणिक संस्थांना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला आहे.
अडवणूक करणाऱ्या संस्थांनी पुढील शिक्षणासाठी त्या विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागू नये याची खबरदारी घ्यावी. आगाऊ स्वरूपात धनादेश घेऊन या विद्यार्थ्यांचे दाखले व निकाल द्यावेत. अन्यथा अशा शिक्षणसंस्थांविरोधात वेगळा विचार करावा लागेल. वेळप्रसंगी कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी सूचित केले.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वह्या घेणे शक्य होत नसल्याने सरकारकडून पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तकासोबत वह्यादेखील मोफत देण्याचा निर्णय घेणार आहे.
तसेच पुस्तकात प्रत्येक पानासोबत एक कोरे पान दिले जाईल, ज्यावर विद्यार्थ्याला सराव करता येऊ शकेल व अतिरिक्त वही नेण्याची गरज भासणार नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.