no images were found
रेल्वे क्रॉसिंगवर लाल झेंडा लावून गेटमन झोपला मोटरमनचं लक्ष गेलं अन्… मोठी दुर्घटना टळली
प्रयागराज : महोबा जिल्ह्यात मोटरमनच्या सतर्कतेमुळं ही मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे क्रॉसिंगचा गेटमन रुळांवर लाल झेंडा लावून ड्युटीवरच झोपी गेला होता. नशीबाने लोको पायलटची नजर लाल झेंड्यावर पडली आणि त्याने इमरजन्सी ब्रेक लावल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळं ट्रेनमधील प्रवाशांचे जीव बचावले आहेत.गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
प्रयागराजहून झाशीला जाणारी पॅसेंजर ट्रेन कुलपहाड स्थानकातील लाडपुरमधील गेट क्रमांक ४१८जवळ पोहोचली तेव्हा तिथे तैनात असलेला गेटमन झोपला होता. ट्रेन तिथून निघण्याची वेळ होत आली होती. तरीही गेटमन झोपलेलाच होता. ट्रेनच्या लोको पायलटला जेव्हा लाल झेंडा आणि गेट उघडा दिसला तेव्हा त्यांनी अनेकदा हॉर्न वाजवला. मात्र तरीही गेट बंद न झाल्यानं त्यानं इमरजन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली.
ट्रेन थांबल्यानंतर रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहिलं तेव्हा ड्युटीवर तैनात असलेला गेटमॅन झोपला होता. इतकंच, नव्हे तर कर्मचाऱ्यांनी क्रॉसिंगजवळ झोपलेल्या गेटमनला जागं करुन रुळांवरील दोन्ही फाटकं बंद करायला सांगितली तेव्हा ट्रेन झासीसाठी रवाना झाली. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला आहे
गेटमॅनच्या या निष्काळजीपणाची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तसंच, या गेटमनला निलंबित करण्यात आलं आहे.