no images were found
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘स्वयम्’ शॉपीचे उद्घाटन
कोल्हापूर, (प्रतिनिधी):– कोल्हापूरमधील शुक्रवार पेठ परिसरात महिलांसाठीच्या ‘स्वयम्’ उपक्रमाच्या पहिल्या स्वतंत्र शॉपीचे उद्घाटन आज मा.ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ. अंजली पाटील वाहिनी, स्वयम् संचालिका सौ. वृंदा सलगर व संचालक श्री. नितीन कामत उपस्थित होते.
मा.ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातून 2023 मध्ये सुरू झालेल्या ‘स्वयम्’ या उपक्रमाला अल्पावधीतच महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “इच्छा – प्रयत्न – प्रगती” या सूत्रावर आधारलेल्या या उपक्रमाद्वारे नोकरी न करणाऱ्या परंतु काहीतरी करून आर्थिक प्रगती साधण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रारंभी गृहपयोगी वस्तूंच्या विक्रीपासून सुरू झालेल्या या उपक्रमात नंतर घरगुती स्वरूपात लोणची, पापड, चटण्या, मसाले यांसारख्या उत्पादनांना विशेष प्राधान्य देण्यात आले. छोट्या छोट्या विक्रीतून बचत साधत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण ‘स्वयम्’ उपक्रमाने घालून दिले आहे.
केवळ दहा महिलांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता दीडशे महिलांपर्यंत पोहोचला आहे. महिलांच्याच हाताने तयार होणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ ‘क्वालिटी मस्त, किमती कमी’ या वैशिष्ट्यामुळे ग्राहकांत लोकप्रिय होत आहेत. सातत्यपूर्ण मागणीमुळे अनेक महिलांनी आपल्या घरीच छोटेखानी शॉपी सुरू केल्या आहेत. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत दर्जेदार वस्तू थेट उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘स्वयम्’ ने शुक्रवार पेठ येथे पहिली पूर्णवेळ शॉपी सुरू केली आहे.
या प्रसंगी चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वयम् उपक्रमाच्या माध्यमातून उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या महिलांचे विशेष कौतुक केले. “महिलांचा खरा सशक्तीकरणाचा मार्ग आर्थिक स्वावलंबनातून जातो. स्वयम् हा त्याचा उत्तम आदर्श आहे,” असे ते म्हणाले. पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
स्वयम् परिवाराच्या वतीने महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.याप्रसंगी सौ वृंदा सलगर, नितीन कामत, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, बाळासाहेब यादव यांच्यासह स्वयंम संस्थेच्या महिलांची उपस्थिती होती.