no images were found
अदानी विद्यापीठात ‘नवदीक्षा 2025’द्वारे भविष्य-केंद्रित नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत
अहमदाबाद, :– अदानी विद्यापीठाने सोमवार, 21 जुलै 2025 रोजी आपल्या शैक्षणिक दीक्षारंभ कार्यक्रम ‘नवदीक्षा 2025’’चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बी.टेक + एमबीए / एमटेक या प्रमुख एकत्रित अभ्यासक्रमांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रेरणादायी भाषणे आणि दूरदृष्टीपूर्ण विचारांनी सजलेल्या या कार्यक्रमात, कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय), शाश्वतता आणि राष्ट्रनिर्मितीच्या आधारे घडणाऱ्या नव्या औद्योगिक युगासाठी भारतीय तरुणांना तयार करण्याचे विद्यापीठाचे ध्येय स्पष्ट झाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आलेले हे एकत्रित अभ्यासक्रम, सखोल वैज्ञानिक दृष्टिकोन, बहुविषयक शिक्षण आणि तंत्रज्ञान, ऊर्जा व पायाभूत सुविधांमध्ये नेतृत्व निर्माण करण्याचा उद्देश ठेवतात. या उद्घाटन समारंभात, जगप्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार आणि हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. राम चरण आणि अदानी ग्रुपचे चीफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर (सीटीओ) श्री. सुदीप्त भट्टाचार्य सहभागी झाले होते, यांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठाचा जागतिक दृष्टिकोन आणि देशाच्या विकासमूल्यांशी असलेली मूल्ये ठळकपणे दिसून आली.
उद्घाटन समारंभाची सुरुवात फॅकल्टी ऑफ सायन्सचे डीन प्रा. सुनील झा यांनी केली. त्यांनी “फिजिकल एआय” च्या युगात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचे महत्त्व अधोरेखित केले. एनबीडीएसचे सीईओ जानसेन वोंग यांचा बीजिंग येथून दिलेला जागतिक सल्ला नमूद करताना, प्रा. झा यांनी विद्यार्थ्यांना केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता खऱ्या जगातील नियम समजून घेण्याचे आवाहन केले. “एआय जेव्हा रोबोटिक्स व ऑटोमेशनसोबत एकत्र येते, तेव्हा यश मिळवण्यासाठी भौतिक नियम समजणे खूप गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. राम चरण यांनी आपल्या 60 वर्षांच्या जागतिक अनुभवावर आधारित विचार मांडले. त्यांचा संदेश साधा पण महत्वाचा होता: “देवाने दिलेली तुमची खास कौशल्य ओळखा, त्यावर निष्ठेने काम करा आणि शिकणे कधीच थांबवू नका.” त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज आत्मपरीक्षण करण्याचा, सतत प्रश्न विचारण्याचा आणि विद्यापीठाकडे आपल्या उद्दिष्ट आणि आनंद शोधण्याच्या जागा म्हणून पाहण्याचा सल्ला दिला.
अदानी विद्यापीठाचे प्रव्होस्ट डॉ. रवि पी. सिंग यांनी आपल्या भाषणात भारताच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की संगणकशास्त्रापासून ऊर्जा अभियांत्रिकीपर्यंतचे हे एकत्रित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी तयार करतात. ते म्हणाले, “तुमची आवड एआय, शाश्वत विकास किंवा पायाभूत सुविधांवर असो, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात.” त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हान दिले की, इतरांच्या मागे न चालता स्वतःचा मार्ग तयार करा आणि शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचा एक भाग म्हणून पहा.
श्री. भट्टाचार्य यांनी भविष्यासाठी एक प्रभावी दिशा दाखवली. त्यांनी एआय क्रांतीचे वर्णन मानवी विचारशक्तीला थेट आव्हान देणाऱ्या पहिल्या औद्योगिक बदल म्हणून केले आणि विद्यार्थ्यांना धाडसी, जिज्ञासू आणि नवोपक्रमकर्ते बनण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मशिन्स आता विचार करू शकतात. पण फक्त माणसांमध्ये विश्वास ठेवण्याची, एकत्र काम करण्याची आणि उद्दिष्टपूर्ण निर्मिती करण्याची ताकद असते.” तसेच, त्यांनी अदानी ग्रुपच्या सुरू असलेल्या 90 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा उल्लेख केला आणि ही संधी तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा क्षेत्रातील भविष्यातील व्यावसायिकांसाठी खूप मोठी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आमिषकुमार व्यास यांनी मनापासून आभार मानून केला. त्यांनी या नव्या विद्यार्थ्यांमध्ये असलेला उत्साह आणि क्षमता विद्यापीठासाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकते, असा विश्वास व्यक्त केला.