no images were found
ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरित दाद मागा- जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : दैनंदिन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरित दाद मागावी. तसेच यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतचा फलक सर्व बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना लीड बँकेने द्याव्यात. प्रत्येक तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये समाधान शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिराची व्यापक प्रसिद्धी करावी तसेच या शिबिरातून वितरित करण्यात येणाऱ्या दाखल्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्राहकांच्या तक्रारीबाबत बैठकीत प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर जलद कार्यवाही करा व याचा अहवाल जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या पुढील बैठकीत सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी यावेळी दिल्या.
दैनंदिन व्यवहारात ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत व त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी चर्चा केली.