no images were found
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत खलनायकाची भूमिका करणार रजत दहिया
सोनी सबवरील ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेतील अनपेक्षित कलाटण्या आणि जटिल व्यक्तिरेखा यांच्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे. नुकत्याच, युग (शब्बीर अहलूवालिया) आणि कैरी (आशी सिंह) यांच्यातील बदलत्या नात्याचा आनंद घेऊ लागलेल्या प्रेक्षकांना अचानक विक्रम (विकी) मल्होत्रा (रजत दहिया)च्या एंट्रीमुळे एक नाट्यात्मक धक्का बसला आहे. विक्रम मल्होत्रा एक मोहक व्यक्तिमत्त्वाचा पण कुटिल वृत्तीचा वकील आहे, जो युगचा व्यावसायिक शत्रू आहे.
विक्रम ही काही साधीसुधी व्यक्तिरेखा नाही. तो युगचा जुना प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या इतिहासात फसवणूक आणि निरंतर संघर्ष आहे. त्यांच्या आगमनामुळे मनात खोल दाटलेले तणाव पुन्हा वर आले आहेत. युगच्या जीवनात तर त्यामुळे गोंधळ माजलाच आहे, पण कैरी सोबतचे त्याचे नाजुक नाते देखील प्रभावित होणार आहे. वरकरणी विक्रम शांत आणि मोहक दिसत असला, तरी त्याच्यात जुना राग ठासून भरला आहे. सत्य कसे खोटे भासवावे आणि खोट्याला कसा सत्याचा मान मिळवून द्यावा हे तो जाणतो. त्यामुळे त्याच्या येण्याने कथानकात अनपेक्षित वळणे येणार हे नक्की.
टेलिव्हिजन मालिकांमधील त्याच्या प्रभावी अभिनयाबद्दल ओळखला जाणारा रजत दहिया आपल्या भूमिकेविषयी म्हणतो, “विक्रमच्या व्यक्तिरेखेतील गुंतागुंत आणि त्याचे अनपेक्षित वागणे यामुळे मी त्याच्याकडे आकृष्ट झालो. तो फक्त एक खलनायक नाही- लोकांची कमजोरी ओळखून त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा हे त्याला बरोबर समजते. तो तुम्हाला मोहित करतो, स्वतःविषयीच तुम्हाला साशंक करतो आणि त्याला हव्या त्या पद्धतीने परिस्थिती वळवून घेतो. हे करताना सगळ्यांपेक्षा तो दोन पावले पुढेच असतो. पण यातील मेख अशी आहे की, तो केवळ दुष्टपणाने हे करत नाही, तर त्याचे दुखावलेले मन, अभिमान आणि वैयक्तिक भूतकाळ यामुळे त्याचे वागणे असे आहे. युग आणि त्याच्यामधील मानसिक रस्सीखेच कशी चालते हे बघण्यास मी उत्सुक आहे. विशेषतः एका आगळ्यावेगळ्या प्रेमकाहाणीत हा संघर्ष दाखवल्याने तो अधिकच रोचक होतो.”