
no images were found
ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव परिषदेचा इतिहास महाराष्ट्रभर पोहोचवणार – सुनील वारे
कोल्हापूर, : ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव परिषदेचा इतिहास महाराष्ट्रभर पोहोचवणार, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी) चे महासंचालक सुनील वारे यांनी केले. दिनांक 21 व 22 मार्च 1920 रोजी संपन्न झालेल्या दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या बहिष्कृत परिषदेस यावर्षी 105 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने 105 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्यपणे साजरा करण्यासाठी सुनील वारे माणगाव येथे कार्यक्रमाच्या तयारी निमित्त झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अशोकराव माने, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रारंभ बिंदू म्हणून माणगाव परिषदेकडे पाहिले जाते. अनेक महत्त्वकांक्षी निर्णयांनी माणगाव परिषद ऐतिहासिक ठरली आहे. या परिषदेचा गौरवशाली व प्रेरणादायी इतिहास तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाठ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय विभाग मंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच लोकप्रतिनिधी यांचीही उपस्थिती असणार आहे.
यावेळी आमदार अशोकराव माने यांनी मार्गदर्शन करून नियोजना संबंधी महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमासाठी सर्व परीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या दिवशी माणगाव स्मारकाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांच्या भीम गायनाचा जलसा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बार्टी मार्फत पुस्तकांचा स्टॉल उभारला जाणार असून अल्प दरात महामानवांच्या पुस्तकांचा संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियोजित सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण विविध प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात येणार असून विविध माध्यमातून या सर्व कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
बैठकीस समाजभूषण अनिल कांबळे माणगांवकर, माजी सरपंच अविनाश माने, माजी उपसरपंच अख्तर हुसेन भालदार, उमेश जोग, नंदू शिंगे, मुरलीधर कांबळे, सुंदर कांबळे, बाबासाहेब सनदी, शिरीष मधाळे, मधुकर माणगांवकर, प्रवीण कांबळे, बताश कामत, श्याम पेंटर, पांडुरंग कांबळे, भिकाजी शिंगे, बाबासो कांबळे उपस्थित होते.