
no images were found
आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु
कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सोडत (लॉटरी) दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी दि. 14 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कालावधी देण्यात येत आहे. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे अशा विद्यार्थ्यांची निवड यादी व पुढील फेरीसाठी प्रतिक्षा यादी RTE पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात आली आहे.
शहर स्तरावर महानगरपालिकेकडील व तालुका स्तरावर पंचायत समितीकडील पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांस प्रवेशासाठी बोलविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करुन पालकांना परत करावे, तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. पालक काही कारणास्तव दिलेल्या तारखेस कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहू शकले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरीता पालकांनी विहीत मुदतीत पडताळणी समितीशी संपर्क साधावा.
पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांचा रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय यांची पडताळणी करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी, जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशासाठी तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाहीत तर विहीत मुदतीत आरटीई पोर्टलवर Not Approach करावे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आरटीई पोर्टलवर करण्यात आली आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन संबंधित शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व या माहितीचा लाभ घ्यावा.