Home मनोरंजन स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका लग्नानंतर होईलच प्रेम आणि तू ही रे माझा मितवा 

स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका लग्नानंतर होईलच प्रेम आणि तू ही रे माझा मितवा 

45 second read
0
0
24

no images were found

स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका लग्नानंतर होईलच प्रेम आणि तू ही रे माझा मितवा 

                                                                   

महाराष्ट्राची पहिली पसंती असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या अभिरुचीचा नेहमीच विचार करत नवनव्या कलाकृती सादर केल्या आहेत. त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. स्टार प्रवाह परिवारात लवकरच दाखल होतेय नवी मल्टीस्टारर मालिका लग्नानंतर होईलच प्रेम! मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशिब लागतं. मात्र प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. नात्यातल्या या हळुवार धाग्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अश्या अनेक दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

जवळपास ४ वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. नंदिनी मोहिते पाटील असं तिच्या व्यक्तिऱेखेचं नाव असून समाजकार्याची आवड असणारी आणि सतत इतरांच्या हितासाठी झटणारी तिची व्यक्तिरेखा आहे. स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर या मालिकेत मृणालच्या बहिणीची म्हणजेच काव्या मोहिते पाटील ही भूमिका साकाणार आहे. हजरजबाबी, प्रेमळ आणि खोडकर असणारी काव्या आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असते. देवयानी नंतर जवळपास ८ वर्षांनंतर विवेक सांगळे स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. मिश्किल स्वभावाचं जन्मेजय हे पात्र तो या मालिकेत साकारणार आहे. पिंकीचा विजय असो मालिकेतला युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत जन्मेयजच्या मोठ्या भावाची म्हणजेच पार्थ देशमुख ही भूमिका साकारणार आहे. शांत आणि सुस्वभावी असणारा पार्थ सहसा कुणाच्या वाकड्यात शिरत नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या या व्यक्तिरेखा कश्या एकत्र येतात हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

लग्नानंतर होईलच प्रेम प्रमाणे अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट देखिल भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे तू ही रे माझा मितवा. या मालिकेतल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील. तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकांविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘लग्नानंतर होईलच प्रेम आणि तू ही रे माझा मितवा या दोन नव्या मालिका सादर करताना अतिशय आनंद होतोय. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेविषयी सांगायचं तर प्रेमविवाहावर भाष्य करणाऱ्या मालिका आपण याआधी पाहिल्या आहेत. पण अरेंज मॅरेजची गोष्ट थोडी वेगळी आहे. लग्नानंतर त्या व्यक्तीवर प्रेम हे होतंच. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हण्टलं जातं. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी जे नशिबात आहे ते होणारच. अशीच एक गुंतत जाणारी आणि गुंतवून ठेवणारी हृदयस्पर्शी मालिका रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. लग्नासोबत खूप भावना आणि अपेक्षा जोडलेल्या असतात. ही भावनिक मालिका त्याच गोष्टी मांडेल. तू ही रे माझा मितवा ही एक युवा प्रेम कहाणी आहे. या मालिकेतून परस्पर नाते संबंध उलगडतीलच पण या दोन प्रमुख पात्रांमध्ये एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळेल. प्रेम आहे पण व्यक्त होता येत नाही, राग आहे पण प्रेमामुळे रोखून ठेवलंय अशी ही दोन विरुद्ध माणसांची प्रेम कहाणी फुलत जाईल जी रसिकांना नक्की आवडेल. तेव्हा नक्की पहा लग्नानंतर होईलच प्रेम १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता आणि तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…