no images were found
मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी अचूक व पारदर्शक काम करा – अमोल येडगे
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उद्या जिल्ह्यातील 10 मतदारसंघात निवडणूक होत आहे. यासाठी जिल्ह्यात 3 हजार 452 मतदान केंद्रांची तयार करण्यात आली आहे. या मतदानासाठी नियुक्त 16 हजार 237 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी मतदानाशी संबंधित अंतिम प्रशिक्षण झाले. यावेळी सर्व मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर सर्व पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. या प्रशिक्षणा दरम्यान मतदानासाठी नियुक्त केलेल्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अचूक व पारदर्शक काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी कर्तव्यावर जाणाऱ्या पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिल्या. विवेकानंद कॉलेज येथे आज विधानसभा निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व साहित्य वाटपाच्या कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, शिरोळ, हातकणंगले व इजलकरंजी या मतदारसंघातील साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेटी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणाबाबत सविस्तर माहिती घेऊन निवडणुकीचे महत्व समजून प्रत्येकाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडण्यासाठी सूचनांचे तंतोतंत पालन करावे. निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले छापील साहित्याचे वाचन करून प्रत्येक बाबीची माहिती घ्यावी. निवडणूक पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असून ती अधिक चांगल्या प्रकारे पार पाडावी. आपल्या अनुभवाचा मतदानाची टक्केवारी वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. मतदारसंघनिहाय मतदानाची अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फत वरिष्ठांना सादर करावेत, असे सांगून सर्व निवडणूक पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मतदान कामकाजासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी निवडणूक अधिकारी संपत खिलारी, मतदानासाठी नियुक्त नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यशस्वी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील 16 हजार तर पोलीस विभागाच्या 8 हजार असे जवळपास 25 हजार सहभागी मतदान केंद्राकडे रवाना
मतदान केंद्रांवरील विविध प्रकारच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी 16 हजार 237 अधिकारी कर्मचारी एकुण 3 हजार 452 मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 8 हजार 157 पोलीस अधिकारी, होमगार्ड, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. असे मिळुन जिल्ह्यात एकुण जवळपास 25 हजार अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया निर्विघ्न आणि पारदर्शकपणे यशस्वी करण्यासाठी काम करीत आहेत. जिल्ह्यातील 3 हजार 452 मतदान केंद्रासाठी 4 हजार 176 बॅलेट युनिट, 3452 कंट्रोल युनिट, तेवढेच व्हीव्हीपॅट उपयोगात येत आहेत. तसेच 830 बॅलेट युनिट, 686 कंट्रोल युनिट, 1032 व्हीव्हीपॅट राखीव ठेवली आहेत.
जिल्ह्यातील 33 लाख मतदारांच्या स्वागतासाठी मतदान केंद्र सज्ज
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात एकुण 33 लाख 5 हजार 98 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्यासाठी 3452 मतदान केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. यातील 143 ठिकाणी आदर्श मतदान केंद्र व स्थानिक विषयांवर आधारीत मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. जिल्हयात मतदारांनी मतदान करावे त्यांना मतदान एक उत्सव वाटावा यासाठी प्रशासनाकडून संपुर्ण तयारी करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना आवश्यक किमान सुविधा यात पुरेशी सावली, रांगांसाठी चांगल्या सुविधा, पाणी, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याची मतदान टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघातील 3 हजार 452 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. लोकशाही बळकटीकरण्यासाठी एक एक मत महत्वाचे आहे, हा सुट्टीचा दिवस नसून लोकशाहीने दिलेले कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी मतदान करुन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा, असेही ते म्हणाले.