no images were found
बादल पे पांव है’ मालिकेत गौरव शर्माची एंट्री
सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ या मालिकेत बानी (अमनदीप सिद्धू) या महत्त्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी तरुणीची गोष्ट सांगितली आहे, जी आर्थिक अडचणींना तोंड देऊन आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत झटत असते. मालिकेत अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले की, बानीचा पती रजत (आकाश आहुजा) याला अटक झाल्यामुळे बानी कठीण प्रसंगात अडकली आहे. त्याच्या जामिनासाठी पैसे उभे करण्यासाठी एका बेकायदेशीर व्यवहारात सामील होण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय तिच्यापाशी शिल्लक राहात नाही.या सगळ्या गदारोळात एक रहस्यमय नवीन माणूस तिच्या परिचयात येतो.
उत्तम अभिनेता गौरव शर्मा माहिर ढिल्लोन नामक अत्यंत हुशार वकीलाच्या भूमिकेत या मलिकेत दाखल होत आहे. नैतिकदृष्ट्या भ्रष्ट लोकांच्या पाठीशी आपण कधीच उभे राहणार नाही, हे तत्त्व जपणारा हा वकील आहे. नातेसंबंधांबद्दल त्याची मतं बरीचशी एककल्ली आहेत.स्त्रिया प्रेमाच्या नाही तर नेहमी पैशाच्याच मागे असतात असे त्याचे ठाम मत आहे. तो जेव्हा बानीला भेटतो, तेव्हा तिचा दृढनिर्धार आणि सच्चेपणा बघून तो थक्क होतो. तिचा प्रामाणिकपणा, रजतवरचे तिचे प्रेम तसेच तिची धडाडी पाहून माहिर अवैध स्टॉक व्यवहारात अडकलेल्या बानीला बाहेर काढण्यासाठी कायदेशीर मदत करण्यास तयार होतो. अशाप्रकारे माहिरने बानी आणि रजतच्या जगात प्रवेश केल्यामुळे पुढे कथानकात काही ना काही ट्विस्ट आणि संघर्ष नक्कीच असणार आहे.
बानीची केस लढण्यासाठी माहिर केवळ तिचा साथीदार बनून राहील का?
माहिरच्या भूमिकेद्वारे या मालिकेत दाखल झालेला अभिनेता गौरव शर्मा म्हणतो, “माहिरच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत. स्वतःच्या क्षमतांवर त्याचा विश्वास आहे, पण प्रेम आणि नातेसंबंधांविषयी तो नेहमीच साशंक असतो. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व रोचक होते. रजत आणि बानीच्या जीवनात लावण्याने प्रवेश केल्यानंतर त्या दोघांमध्ये झालेला संघर्ष प्रेक्षकांनी बघितला आहे.आता माहिरच्या परिचयामुळे त्या दोघांच्या जीवनात एक नवेच आव्हान असणार आहे. मी अलीकडेच या मालिकेचे शूटिंग सुरू केले आहे. येथील कलाकार आणि क्रू सदस्य यांनी खुल्या दिलाने मला स्वीकारले. मालिकेचे कथानक उलगडत जाईल, माहिरची भूमिका स्पष्ट होत जाईल तसे या मालिकेत काही तीव्र, उत्कट क्षण नक्कीच येणार आहेत!”