no images were found
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करा
कोल्हापूर : शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती तथा नवबौध्द घटकांतील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये नियमित प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे, म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा शैक्षणिक संस्थेमार्फत उपलब्ध होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी दि. 30 नोव्हेंबर 2024 अखेर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
यासाठी एकूण 43 हजार रुपये अनुदान 10 महिन्याकरीता देय असून ते दोन टप्प्यामध्ये अदा करण्यात येईल. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये अनुदान व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष –
विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे गतवर्षीचे (सन 2023-24) वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
या योजने अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी.च्या परिसरात असलेल्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्था या ठिकाणी प्रवेशित असणाऱ्या व भाड्याने राहत असणाऱ्या (कुटुंबापासून स्वतंत्र) विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये किमान 50 टक्के व दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयामधील उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक राहील. लाभास पात्र असलेला विद्यार्थी हा भारत सरकार शिष्यवृत्ती करीता पात्र असावा.
कोल्हापूर महानगरपालिका व महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसर असणाऱ्या हद्दीतील सर्व महाविद्यालयांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील आपल्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेबाबत https://hmas.mahai.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती द्यावी, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.