
no images were found
‘श्रीमद् रामायण’ मध्ये मिथीला नगरीत लव आणि कुश या आपल्या मुलांशी श्रीरामाची भेट होणार का?
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ ही राम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांचे चरित्र उलगडणारी मालिका आहे. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की सीता फाल्गु नदीकाठी प्रार्थना करत असताना सहस्ररावणाने (प्रणीत भट्ट) पाठवलेल्या दैत्यापासून सीतेचे रक्षण लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) या तिच्या दोन पुत्रांनी केले. त्यावेळी लव आणि कुश यांची भेट राजा जनकाशी (जितेन लालवाणी) झाली. जनकाने त्यांना एक दिव्य बाण दिला, ज्याचा उपयोग करून त्यांनी दैत्याचा पराभव केला आणि सीतेला वाचवले. अर्थात, त्यावेळी जनकाला हे माहित नसते की ही दोन दिव्य मुले ही त्याचीच नातवंडं आहेत.
आगामी भागांमध्येजनक राजा मिथीला नगरीत परततो. आश्रमात भेटलेली ती दोन मुले इतकी कुशल धनुर्धर कशी काय याचा विचार तो करत असतो. ते सीतेचेच पुत्र तर नाहीत अशी शंका त्याच्या मनात येते. त्यानंतर तो मिथीलेत एक धनुर्विद्या स्पर्धा योजतो आणि लव-कुशला त्यासाठी आमंत्रित करतो. ते दोघे निघताना माता सीतेचा आशीर्वाद घेतात. दरम्यान अयोध्येत श्रीराम पुन्हा विवाह न करता व्रतस्थ राहण्याचा आणि राज्य भरताला (निखिलेश राठोड) सोपवण्याचा निर्णय घेतात, जेणेकरून तो आपल्या पत्नीसह अश्वमेध यज्ञ करू शकेल. श्रीराम जनक राजाला यज्ञाचे आमंत्रण देण्यासाठी मिथीला नगरीस जाण्यास निघतात. यापुढे एक महत्त्वाचा क्षण येणार आहे: मिथीलेत श्रीराम आपल्या पित्याच्या बाबतीत अनभिज्ञ असलेल्या आपल्या दोन्ही पुत्रांना भेटणार का?
‘श्रीमद् रामायण’ मध्ये श्रीरामाची भूमिका करत असलेला सुजय रेऊ म्हणतो, “या महाकथेतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. त्या क्षणात कुतूहल आणि अभिमान आहेच आणि हे दोन दिव्य पुत्र कोण आहेत हे जाणून घेण्याची ओढही आहे. श्रीराम लव-कुशला भेटणार का ही उत्कंठा या प्रसंगात आहे. ते खरोखरच भेटतील का? ते दोघे कोण आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल का? यापुढील वाटचालीत एक अपेक्षा असणार आहे. हा नियतीचा क्षण आहे, जो उलगडण्यासाठी आतुर आहे.”