
no images were found
काजु बी अनुदान योजनेस 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य काजु मंडळाच्या माध्यमातुन काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी “काजु बी अनुदान योजना” जाहीर केली आहे. काजु बी अनुदानासाठी विहीत नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य काजु मंडळाकडे दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावयाचे होते. तथापि ही योजना सर्वसामान्य काजु उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याने व जास्तीत जास्त काजु उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी या योजनेस दि.30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी दिली आहे.
काजु उत्पादक शेतकरी या योजनेचे लाभार्थी असतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काजु उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर काजु लागवडीची / झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजुंच्या झा़डांची संख्या व त्यापासुन प्राप्त काजु बी उत्पादन याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे. काजु उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजु व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजु प्रक्रीयादार यांना काजु बी ची विक्री केली असणे आवश्यक आहे. काजु उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजुच्या विक्री पावतीवर नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपुर्ण नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काजु उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संलंग्नित बचत बॅंक खात्याच्या क्रमांकसह तपशील द्यावा. काजु बी अनुदान योजनेचा परिपुर्ण प्रस्ताव महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, शाहु मार्केट यार्ड कोल्हापूर येथे सादर करावा, असेही श्री. घुले यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.