no images were found
शहर खड्डेमुक्त करा आणि मगच गणेश मंडळांकडून खड्डा पावती घ्या – “आप” ची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी):-गणरायाचे आगमन लवरच होत आहे. शहरातील अनेक तरुण मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. सार्वजनिक ठिकाणी मांडव टाकून बाप्पाची प्रतिष्ठापणा केली जाते. यासाठी काही वेळेस खड्डे खणले जातात, तर बऱ्याच वेळेस ते न खणता देखील मांडव उभारणी केली जाते. प्रत्येक मंडळाला खड्डे पावती पोटी किमान दोन हजार इतकी रक्कम महापालिकेला द्यावी लागते.
यावर्षी शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत. अशावेळी गणेश मंडळांकडून खड्डा पावती घेणे योग्य नाही. ती घ्यायची झाल्यास आधी रस्ते खड्डेमुक्त करा आणि मगच खड्डा पावती घ्या अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महापालिका प्रशासनाला दिला. याबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा झाली.दोष दायित्व कालावधी मधील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरु नाही. खड्ड्यांसाठी जबाबदार ठेकेदार आणि प्रशासन असताना गणेशोत्सव मंडळांना त्याचा भुर्दंड का असा सवाल देसाई यांनी केला.
खड्डे पावती माफ करण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास शहरातील सर्व मंडळे याविरोधात एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा आप ने दिला. याबाबतचे निवेदन उपायुक्त साधना पाटील यांना देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, विजय हेगडे, मयूर भोसले आदी उपस्थित होते.