
no images were found
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळावा संपन्न
कोल्हापूर : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेतंर्गत युवकांनी घेतलेल्या शैक्षणिक अर्हतेनंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे. शासन निर्णयाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी बँका, पतसंस्था, बाजार समिती व इतर प्रकारच्या संस्थांमध्ये 577 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींसाठी जागा उपलब्ध होत्या. त्यानुसार प्रशिक्षणार्थी उपलब्ध पदांकरीता 12 वी, पदवीका व पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य मेळावा आज श्री वीरशैव को-ऑप बँक लि., कोल्हापूर, ताराराणी चौक, कोल्हापूर यांच्या सभागृहात संपन्न झाला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्याकरीता कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण 64 सहकारी संस्थांनी उपस्थिती नोंदवून आपला सहभाग दर्शविला. 400 पेक्षा जास्त उमेदवारांनी मेळाव्यास भेट देऊन सदर योजनेचा लाभ घेतला आहे. बहुतांश सर्व उपस्थित उमेदवारांनी विविध संस्थांचे आस्थांपनांकडे मुलाखती दिल्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्यामध्ये 35 सहकारी संस्थांच्या आस्थापनांनी मेळाव्यातील 196 उमेदवारांची निवड केलेली असून मेळाव्यामधील 21 उमेदवारांना आजच नियुक्ती आदेश देण्यात आले. तसेच उर्वरित सर्वच पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश लवकर देण्यात येणार आहेत. या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देवून योजनेस उच्चांकी प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन या योजनेचा उद्देश व कार्य याबाबत उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच सहकारी संस्थांना त्यांनी लवकरात लवकर उमेदवार निश्चित करुन नियुक्ती आदेश देण्याचे आवाहन केले, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली आहे.