
no images were found
तरुणाची चोर समजून धुलाई
सातारा : बुरखा घालून प्रेयसीला भेटायला आलेल्या एका तरुणास मुलं चोरणारा समजून नागरिकांनी बदडल्याची घटना सातारा शहरात घडली. शाहूपुरी पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
प्रेमात एकमेकांना पाहण्याची किंवा भेटण्याची ओढ कोणाला काय करायला लावेल सांगता येत नाही. साताऱ्यात प्रेमाचा असाच आगळावेगळा प्रकार समोर आलाय. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला. परंतु, ही युक्ती प्रियकराला चांगलीच महागात पडलीय. मुलं चोरणारा व्यक्ती समजून लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे, प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघंही विवाहित आहेत. साताऱ्यातील तामजाईनगरमधली ही घटना आहे.
एक व्यक्ती बुरखा घालून आला होता. तो शाळेचं नाव विचारात होता. यावेळी तिथल्या एका दुकानदाराला संशय आल्यानं त्यानं त्याला पकडलं. यावेळी बुरख्यात स्त्री नसून पुरुष असल्याचं लक्षात येताच हा मुलं पळवायला आला की काय, अशा संशय आल्यानं त्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच आपण प्रेयसीला भेटायला आल्याचं कबूल केलं आणि पोलिसही चक्रावले. पण, प्रेयसीला वेश बदलून भेटायला जाणं या प्रियकराला चांगलंच महागात पडलंय.