no images were found
भागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन आणि रोटरॅक्ट क्लबच्या वतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांसाठी झाला रक्षाबंधन, कारागृह ग्रंथालयाला दिली पुस्तकांची भेट
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-जाणते अजाणतेपणी गुन्हा घडल्याची ते शिक्षा भोगत आहेत. कळंबा कारागृहात असलेल्या कैद्यांना सण, उत्सव घरच्यांबरोबर साजरा करता येत नाही. अशा परिस्थितीत भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन आणि रोटरॅक्ट क्लबच्या वतीने, यंदाही बंदीजनांसाठी रक्षाबंधन उपक्रम राबवला. कळंबा कारागृहातील कैद्यांना राखीचा धागा बांधून, त्यांच्यातील हळव्या मनाला आधार दिला. शिवाय कारागृहाच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं भेट देण्यात आली.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात १ हजारपेक्षा अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहेत. कळत नकळत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल त्यांना पश्चाताप होतोय. पण न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगणे आवश्यक आहे. कुटुंबीयांपासून लांब असलेल्या, कैद्यांना सण – समारंभाचा आनंद मिळत नाही. तर अनेकांना रक्षाबंधना दिवशी आपल्या बहिणीची आठवण कासावीस करते. अशावेळी कळंबा कारागृह प्रशासनाच्या पुढाकारातून, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन आणि रोटरॅक्ट क्लबच्या वतीने कळंबा कारागृहात रक्षाबंधनाचा सोहळा झाला. प्रारंभी कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. अशा उपक्रमातून कारागृहात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. बंदीजन काही तासांसाठी आपली दु:खं विसरून जातात, असे कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले. तसेच सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून गेल्या १५ वर्षापासून सुरु असलेल्या या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर भागीरथी संस्थेच्या अश्विनी वास्कर, दीपा पाटील, रजनी लिगाडे, दीप्ती पाटील यांनी कारागृहातील बंदीजनांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. राखीचा पवित्र धागा बांधून, त्यांनाही मानवतेच्या नात्याची अनुभूती दिली. तसेच संस्थेच्यावतीने कारागृहातील ग्रंथालयाला विविध पुस्तकं भेट देण्यात आली. बंदीजनांनी स्वतःच्या कुटुंबात आनंदी राहण्यासाठी यापुढे गुन्हेगारीचा मार्ग सोडावा, अशी कळकळीची विनंती संस्थेच्या कार्यकर्त्या अश्विनी वास्कर यांनी केली. यावेळी कारागृहाचे उपअधीक्षक साहेबराव आडे, कर्मचारी विठ्ठल शिंदे, धनंजय महाडिक युवाशक्तीचे सुनील वाडकर यांच्यासह अन्य कर्मचारी आणि बंदीजन उपस्थित होते.